

दुकानवाड : माणगाव खोऱ्यातील शिवापूर-वसोली सीमेवर आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात अगरबत्तीच्या धुरामुळे विचलीत झालेल्या मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवला. या मधमाश्यांच्या हल्ल्यात सुमारे ११ ग्रामस्थ जखमी झाले असून, यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. ही थरारक घटना रविवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तेथील वाहनांमधून पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे उपस्थितांनी सांगितले.
शिवापूर (ता. कुडाळ) येथे रविवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना तेथे लावलेल्या अगरबत्तीचा धूर मोठ्या प्रमाणावर पसरला. या धुरामुळे झाडावरील पोळ्यातील मधमाश्या उठल्या आणि त्यांनी ग्रामस्थांवर अचानक आणि हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी एकच धावपळ आणि घबराट उडाली.
माजी सैनिकाचे प्रसंगावधान आणि सुटका!
मधमाश्यांचा हल्ला होताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माजी सैनिक दिनकर पालकर यांनी सर्वांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तर पत्रकार विजय पालकर आणि माजी सभापती मोहन सावंत यांनी वेळ न दवडता जखमींना आणि इतर ग्रामस्थांना तातडीने चारचाकी वाहनांमधून माणगावच्या दिशेने मार्गस्थ केले. या घाईगडबडीत आणि मधमाश्यांच्या डंखांमुळे लहान मुलांसह ११ जण जखमी झाले.
तिघांची प्रकृती गंभीर
या सर्व जखमींना तातडीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, जखमींपैकी शिवाजी नाना गुंजाळ, मधुकर कदम आणि अशोक गुंजाळ हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलवण्यात आले आहे. तर उर्वरित ८ जणांवर माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.