Sindhudurg : घरफोडी झाली, पण 24 लाखांच्या ऐवजाची चोरी फसली

पिंगुळीत भरदिवसा चोरट्यांनी बंद बंगला फोडला!
Sindhudurg News
पिंगुळीत भरदिवसा चोरट्यांनी बंद बंगला फोडला!
Published on
Updated on

कुडाळ : पिंगुळी-राऊळवाडी येथील सौ. दीपा संतोष परुळेकर यांचा बंद बंगला चोरट्याने फोडून तब्बल 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये रोकड, असा सुमारे 24 लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार गुरुवारी रात्री कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात घरातील सामानाची तपासणी केली असता सदर दागिने व रोकड घरातील पलंगाच्या कप्प्यात सापडून आली. यामुळे पोलिसांसह परूळेकर दांपत्याने सुटकेचा निःश्वास सोडला. घरफोडीचा हा प्रकार गुरुवारी सकाळी 9.45 ते सायं. 7 वा. या वेळेत घडली.

याबाबतची फिर्याद सौ. दीपा परुळेकर (रा. पिंगुळी-राऊळवाडी) यांनी गुरूवारी रात्री कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सौ. दीपा व त्यांचे पती संतोष परुळेकर हे दोघेही शासकीय सेवेत आहेत. गुरुवारी सकाळी ते दोघेही सिंधुदुर्गनगरी येथे कामावर गेले. सायंकाळी 7 वा. च्या सुमारास दोघेही घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटातील तसेच पलंगामधील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसून आले. त्यांनी एका डब्यात सोन्याच्या चेन, अंगठ्या, हार, बांगड्या, ब्रॅसलेट, नथ आदी विविध प्रकारचे सुमारे 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घरात ठेवली होती. चोरट्यांनी सदर डबा लांबवल्याच्या कल्पनेनेच परूळेकर दांपत्याला मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दिली.

घरफोडीचा हा गुन्हा मोठा असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड व श्री. हडळ व कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेगाने तपास सुरू करीत संशयित चोरट्याचा शोध सुरू केला. दरम्यान, घरातील साहित्याची तपासणी करताना चोरट्यांनी विस्कटलेल्या साहित्याच्या पुढे वरील ऐवज असलेला डाबा सर्व दागिने व रोकडसह आढळून आला. त्यामुळे पोलिसांसह परूळेकर दांपत्याने सुटकेचा निःश्वास टाकला.

पिंगुळी-राऊळवाडी येथे भरवस्तीत आणि रस्त्यालगत परूळेकर यांचा बंगला आहे. त्यामुळे भरदिवसा चोरट्याने घरफोडी करण्याचे धाडस केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित चोरट्यांनी बंगल्याचा मागील दरवाजाचा सुरुवातीला कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर तेथील दुसरा दरवाजा त्यांना उघडता आला नाही. त्यामुळे तेथूनच जिन्याने चोरट्यांनी माडीवर जाऊन वरील दोन खोल्यांची कुलूपे तोडून त्या खोल्यांमधील ड्रॉव्हर तसेच बिछाना उघडून साहित्य अस्ताव्यस्त टाकले. परंतु, तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा लक्ष्य करीत मुख्य लाकडी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. बेडरूममधील दोन्ही लोखंडी कपाटे तसेच पलंग उघडून आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकले. परंतु, तिथेच असलेली सोन्याच्या किंमती दागिन्यांचा डबा आणि दीड लाखाची रोकड सुदैवाने चोरट्यांच्या हाती लागली नाही. या घटनेत सर्व सोन्याचे दागिने आणि रोकड सुखरूप घरातच सापडली आहे. तरीही या चोरीच्या प्रयत्नात काही वस्तू चोरीस गेल्या आहेत का? याचा तपास सुरू आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. मंगेश शिंगाडे, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, नंदकुमार चिंदरकर, महेश जळवी यांनी पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news