

कणकवली : कणकवली शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, नादुरुस्त पथदीप आणि प्रलंबित गटारांची कामे 20 जानेवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, अशा ठाम सूचना कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहराचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही. दिलेला शब्द पाळा आणि घेतलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा, अशा शब्दांत नगराध्यक्ष पारकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.
कणकवली नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्ष पारकर यांनी महामार्गाशी संबंधित शहरातील विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला.
महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत, शहरातील बंद पथदीप त्वरित सुरू करावेत, जेणेकरून अपघातांना आळा बसेल, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच, पावसाळ्यापूर्वी प्रलंबित गटारांची कामे पूर्ण करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा. शहरातून निघणारे सांडपाणी थेट नदी-नाल्यात न सोडता, एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्धीकरण करूनच पुढे सोडण्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. यासाठी नगरपंचायतीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रुपेश कांबळे, रोहित गवस, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, मेघन मुरकर, वैभव मालंडकर, तेजस राणे, हरी निखार्गे, भिवा परब, शिरी तेली यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.