

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथील नाईक पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी जातेवेळी रस्ता ओलांडताना कृष्णा सूरेश साटम (३२, रा. निरोम) यांच्या दुचाकीला कणकवलीकडे येणाऱ्या मालवण - कणकवली या एसटी बसची धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा साटम यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरूवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नाईक पेट्रोलपंपासमोरील सर्कल पॉईंटवर झाला.
होमगार्ड असलेले कृष्णा साटम हे कणकवलीकडून मराठा मंडळ रोडने वागदे येथे पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला कणकवलीकडे येणाऱ्या एसटी बसची धडक बसली. त्यात त्यांची मोटरसायकल एसटीच्या पुढील भागाच्या खाली गेली. तातडीने स्थानिकांनी धाव घेवून गंभीर जखमी झालेल्या कृष्णा साटम यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तेजस नलवडे, उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलिस कॉ. प्रणाली जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहने सुरळीत केली. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.