Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ पासून पल्स पोलिओ लसीकरण

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पोलिओ लसीकरण आणि अतिसार नियंत्रण मोहिमेचा आढावा
Sindhudurg News
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेFile Photo
Published on
Updated on

ओरोस : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ही मोहीम २८ जूनपासून सुरू होणार आहे. तसेच १ जून ते ३१ जुलै दरम्यान 'Stop Diarrhoea Campaign' (अतिसार नियंत्रण मोहीम) राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागांचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी आवश्यक सूचना दिल्या. विशेषतः १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व तसेच अतिसार नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी आवश्यक माहिती पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक शुक्रवार (१२ जून) रोजी पार पडली. या बैठकीत जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतिक उगारे यांच्यासह शिक्षण, महिला व बालविकास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मोहिमेदरम्यान एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा प्रवेशोत्सवात मोठ्या संख्येने पालक शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. या संधीचा उपयोग करून शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. लसीकरणामुळे मुलांचे पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होते, तसेच निरोगी भविष्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकांना पटवून देण्यावर भर द्यावा, असेही त्‍यांनी सांगितले. अतिसार नियंत्रण मोहिमेचे अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविणे हे अंतिम ध्येय आहे. अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन करा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी लसीकरण केंद्रांची तयारी, आवश्यक मनुष्यबळ, जनजागृती उपक्रम, दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आणि मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. गावपातळीवरील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन व्यापक जनजागृती करण्याचेही नियोजन करण्यात आले असल्‍याचे सांगितले. अतिसार नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news