Nitesh Rane| वनराई बंधाऱ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान

जिल्हावासीयांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन
Nitesh Rane
वनराई बंधाऱ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान
Published on: 
Updated on: 

कणकवली : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत असून, नागरिकांनीही या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा बांधकामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः श्रमदान करीत बंधारा बांधकामात सहभाग घेतला. जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी कणकवली तालुक्यात २ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही श्रमदानात सहभाग घेतला. जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जि. प.सदस्य मनोज रावराणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच आनंद ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

वनराई बंधारे बांधताना कामाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामसेवक आणि पालकमित्रांनी बंधाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी गुणवत्ता तपासणी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री राणे यांनी यावेळी दिल्या. केवळ बंधारे बांधणे नव्हे, तर त्यांची योग्य पद्धतीने निर्मिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ जलसाठा वाढविण्यासाठी झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

जिल्ह्यात प्रथमच निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे स्वरूप भीषण आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळणे यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे. येणाऱ्या कोणत्याही पिढीला दुष्काळाचे संकट भेडसावू नये, या उद्देशाने ही चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी लोकसहभागाची जोड द्यावी. प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास जिल्ह्याची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news