Sindhudurg News| जिल्हाधिकाऱ्यांवरील अवमानकारक, व्यंगात्मक टीका-टिप्पणीचा अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून निषेध

भविष्यात असा प्रकार घडल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा
Sindhudurg News
जिल्हाधिकाऱ्यांवरील अवमानकारक, व्यंगात्मक टीका-टिप्पणीचा अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून निषेध
Published on: 
Updated on: 

ओरोस : पिंगुळी पाझर तलाव प्रश्नावरून जिल्हाधिकारी यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्‍या अवमानकारक, व्यंगात्मक व दिशाभूल करणाऱ्या टीका-टिप्पणीचा अधिकारी व कर्मचारी वर्गाने निषेध केला आहे. भविष्‍यात जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक वैयक्तिक स्‍वरुपाची अवमानकारक वक्तव्ये, बदनामीकारक व्यंगचित्रे, टीका-टिप्पणी किंवा प्रशासकीय यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण करणारे प्रकार घडल्यास जिल्‍हयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी ते कामबंद आंदोलन छेडतील, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत राज्य सरकारी व जि. प. कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालीका व नगरपरिषद कर्मचारी आदी संघटनेने शुक्रवारी सिधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, सखाराम सपकाळ, राजन वालावलकर, शाम लाखे, दिनेश तेली, रमेश कांबळे, नरेंद्र एडके आदी उपस्थित होते

याबाबत प्रसद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार ते कार्य करीत असतात. अशा जबाबदारीच्या वैधानिक पदावर कार्यरत अधिकऱ्याविरोधात अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यंगचित्रे, उपरोधिक मजकूर व वैयक्तिक टीका-टिप्पण्यांचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या कामकाजाबाबत मतभेद असणे, त्रुटी निदर्शनास आणून देणे अथवा लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाराचा वापर करताना प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांची प्रतिष्ठा, पदाची गरिमा आणि प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान यांचे भान राखणे तितकेच आवश्यक आहे.

महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेला उपोषण व सत्याग्रहाचा मार्ग हा अन्यायाविरुद्ध शांततामय, संयमी व नैतिक पद्धतीने लढा देण्याचे प्रभावी साधन आहे. मात्र, अशा पवित्र मार्गाचा वापर प्रशासकीय अधिकारी यांचेविरुध्‍द वैयक्तिक टीका, उपहास, प्रसिद्धी मिळविणे किंवा प्रतिमा मलिन करण्यासाठी होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आम्ही लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आंदोलनाचा अधिकार आणि प्रशासनावर विधायक टीका करण्याच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतो. परंतु टीका ही वस्तुस्थितीवर आधारित, सभ्य आणि रचनात्मक असावी. कोणत्याही अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला जाणीवपूर्वक धक्का पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींचे आम्ही तीव्र शब्दांत निषेध करित अहोत.

भविष्‍यात जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात जाणीवपूर्वक वैयक्तिक स्‍वरुपाची अवमानकारक वक्तव्ये, बदनामीकारक व्यंगचित्रे, टीका-टिप्पणी किंवा प्रशासकीय यंत्रणेचे मनोबल खच्चीकरण करणारे प्रकार घडल्यास सिंधुदुर्ग जिल्‍हयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग ते खपवून घेणार नाहीत. अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटना एकत्र येऊन संघटितपणे आपला तीव्र निषेध नोंदवतील. तसेच संबंधित प्रकाराच्या गांभीर्यानुसार लोकशाही व कायदेशीर मार्गाने धरणे आंदोलन, निदर्शने, काळ्या फिती लावून कामकाज करणे, निषेध सभा तसेच आवश्यकतेनुसार नियमानुसार कामबंद आंदोलन यांसारख्या आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.