

ओरोस ः सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अनंत दवंगे यांना जाब विचारत रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. यावरून शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी संतप्त होत सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनंत दवंगे यांची शनिवारी भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यावेळी कसाल जि. प. ठाकरे सेना विभागप्रमुख रवीबुवा कदम उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्यातच चांगले उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी आम्ही हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून ते सुरू केले. मात्र डीन म्हणून आपण याठिकाणी चांगली कामगिरी करण्यास कमी पडत आहात. सत्ताधारी खासदार, आमदार देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा शब्दात वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सदर महिला रुग्णाची सोनोग्राफी करण्यात आली होती का याबाबत वैभव नाईक यांनी डीन डॉ. अनंत दवंगे यांना विचारणा केली. त्यावर सोनोग्राफी तज्ज्ञ उपस्थित नसल्याचे दवंगे यांनी सांगितले. मग चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई केली? 1 हजार कोटीचे हॉस्पिटल होत आहे आणि इथले पेशंट रेफर केले जात आहेत ही गंभीर बाब आहे. पेशंट रेफर करण्यासाठी हे हॉस्पिटल आहे का? की या रुग्णालयात पेशंट येऊच नये म्हणून रुग्णालयाची बदनामी केली जात आहे का? असा सवाल वैभव नाईक केला. रुग्णांना चांगली सेवा मिळण्यासाठी रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली पाहिजे. नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिला.