Sindhudurg Gothane Vad- सोसाट्याचा वारा अन् एका क्षणात महाकाय 'गोठणे वड' कोसळला, पण ग्रामस्थांनी काय केलं? वाचा

एका 'वडिलाधाऱ्या' सावलीचा निरोप आणि एका नव्या जन्माची गोष्ट
vad tress
आचरा : कणकवली-आचरा मार्गावरील एसटी स्टॉप 'गोठणे वड' काही दिवसांपूर्वी पडलाpudhari photo
Published on
Updated on

आचरा : माणसं जन्माला येतात, इतिहास घडवतात आणि निघून जातात. पण काही वृक्ष असे असतात, जे स्वतःच एक जिवंत इतिहास बनतात. कणकवली-आचरा मार्गावरील प्रसिद्ध एसटी स्टॉप 'गोठणे वड' हा असाच एक वटवृक्ष ! गेली अनेक पिढ्या पाय रोवून उभा असलेला हा वड म्हणजे गोठणे गावाची ओळखच. पण तीन दिवसांपूर्वी एका वादळी रात्री हा वटवृक्ष कोलमडून पडला.

वटपौर्णिमेच्या अवघ्या तीन दिवस आधी गावाची सावली तथा आचरा मार्ग निर्मितीचा साक्षीदार हरपला...

ज्या वडाभोवती सुवासिनी जन्माजन्मांतरीचे नाते मागतात, त्याच वटवृक्षाने वटपौर्णिमेच्या तोंडावर आपला शेकडो वर्षांचा प्रवास थांबवला. ऊन, वारा, पाऊस स्वतः अंगावर झेलत या वडाने कित्येक पिढ्यांना आणि हजारो प्रवाशांना आपल्या कुशीत विसावा दिला होता. एसटीचा निवारा तयार होण्यापूर्वीपासून हा वृक्ष तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची वाट पाहत उभा असायचा. आचरा मार्गाच्या निर्मितीचा तो एकमेव जिताजागता साक्षीदार होता. त्या रात्री सोसाट्याचा वारा आला आणि एका क्षणात हा महाकाय वटवृक्ष जमिनीवर कोसळला. जेव्हा गोठणे ग्रामस्थांनी हे दृश्य पाहिले, तेव्हा कित्येकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक ज्येष्ठांचे सुख-दुःख या झाडाच्या पाराशी जोडलेले होते.

कृतज्ञतेचा 'गोठणे पॅटर्न'

वटवृक्ष पडल्यानंतर गोठणे ग्रामस्थांनी दाखवून दिले 'कृतज्ञता' काय असते, ज्या झाडाने आपल्याला आयुष्यभर सावली दिली, त्याला अशी पोरकी श्रद्धांजली द्यायची नाही, हे गावाने ठरवले. गावातील वसंत हाटले, संजय लाड, भिकाजी लाड, घनश्याम चव्हाण, जयराम परब, भिवा लाड, श्याम लाड, परेश बाईत, नरेश लाड प्रकाश लाड, शैलेश चव्हाण, राजेंद्र कांता लाड, तुषार लाड, अंबर लाड, महादेव सावंत, मंगेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, विष्णू बागवे, पुनाजी लाड, संदेश लाड, महेश आंगणे, अंकुश वळुंज, पोलिस पाटील महेंद्र तळवडेकर, नीलेश हाटले आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पडलेल्या महावृक्षाच्या जागी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करत विधीवत पूजा करून त्याच जागेवर रविवारी नव्या वटवृक्षाच्या रोपट्याची लागवड केली. जुना वड गेला तरी त्याची 'गोठणे वड' ही ओळख पुसू द्यायची नाही, हा गावकऱ्यांचा निश्चय निसर्गाप्रती असलेल्या अथांग प्रेमाची साक्ष देतो.

vad tress
Wildlife Crime | ज्वेलर्समधून बिबट्याचे दात, नखे, सुळे जप्त; सुवर्णकारास अटक

इतिहास पुन्हा श्वास घेतोय

आज ते लहान रोपटे तिथे लावले गेले असले, तरी गोठणेकरांच्या डोळ्यांसमोर भविष्यातला तोच विशाल वटवृक्ष उभा आहे. जो पुन्हा एकदा येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना हक्काची सावली देईल. माणुसकी आणि निसर्गाचे हे अतूट नाते सांगणारी ही घटना, आजच्या सिमेंटच्या जंगलात जगणाऱ्या आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. नव्याने लावलेल्या त्या लहानशा रोपट्यातून गोठणे गावचा 'तो' जिवंत इतिहास पुन्हा श्वास घेतोय..!

vad tress
Pune Water Tanker SOP: जीपीएस, दरपत्रक, ऑनलाइन बुकिंग अनिवार्य; टँकर व्यवस्थेत मोठे बदल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news