Sindhudurg News : घोटगेवाडी येथे तिलारी नदीत बालक व तरुण वाहून गेले

गंभीर दुर्घटना घडूनही आपत्ती व्यवस्थापनाला तासाभरानंतर मिळाली माहिती
Sindhudurg News
घोटगेवाडी येथे तिलारी नदीत बालक व तरुण वाहून गेले
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील तिलारी नदी पात्रात एक बालक व एक तरुण असे दोघेजण वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी ५.१५ वा.च्या सुमारास घडली. अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी (वय २५) आणि रेगण दिलीप बडा (६, दोघेही रा. छत्तीसगड) अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.

अनुरंजन हे मूळचे छत्तीसगड येथील असून, घोटगेवाडी येथे ते मजुरीचे काम करीत होते. सोमवारी सायंकाळी ते रेगण याच्यासोबत घोटगेवाडी कॉजवेवर गेले होते. यावेळी तिलारी नदीच्या जोरदार प्रवाहात दोघेही वाहून गेले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला; मात्र पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की काही क्षणांतच ते दिसेनासे झाले.

घटनेची माहिती मिळताच कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दोघांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली; मात्र नदीच्या प्रचंड प्रवाहापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र सायंकाळ झाल्याने शोधमोहीम स्थगित करण्यात आली. काहींनी ड्रोनच्या साहाय्यानेही नदीपात्र व परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु रात्री उशिरापर्यंत दोघांचा थांगपत्ता लागला नाही. तेरवण मेढे उन्नैयी बंधारा तसेच तिलारी धरणाचे अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडण्यात आल्याने नदीच्या प्रवाहाला मोठा वेग आहे.

तालुका आपत्ती व्यवस्थापन घटनेपासून अनभिज्ञ

घोटगेवाडी येथे एवढी गंभीर दुर्घटना घडूनही घटनेनंतर तब्बल तासभर तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याची माहितीच नसल्याचे समोर आले. पत्रकारांनी या विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती विचारली असता, विभागाला दुर्घटनेची माहिती मिळाल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news