

काशिराम गायकवाड
कुडाळ : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तीशाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे. बाप्पाच्या मूर्तींना रंगरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यासाठी कारागिरांची अक्षरशः धावपळ सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्सवात एआय पेंटिंगसह छत्रपती रूपातील गणपती बाप्पाच्या मूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळत असून, पारंपरिक माती व कागदी लगद्याच्या मूर्तींसोबतच पीओपीच्या मूर्तींनाही मोठी मागणी आहे.
गणेश मूर्तीशाळांमध्ये केवळ कारागीरच नव्हे, तर वाडीतील लहान मुले, युवक आणि कुटुंबातील सदस्यही उत्साहाने मदत करताना दिसत आहेत. गणेशमूर्ती घडविण्याची ही परंपरा आणि कला पुढील पिढीकडेही पोहोचावी, यासाठी अनेक कुटुंबातील तरुण आवडीने या कामात सहभागी होत आहेत. गणेश चतुर्थीच्या तीन-चार दिवस आधीपासून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विविध भागांतून भक्त आपल्या पसंतीच्या गणेशमूर्ती नेण्यासाठी मूर्तीशाळांमध्ये येतात. त्यामुळे मूर्ती पूर्ण करण्यासाठी कारागिरांनी कामाचा वेग वाढविला आहे. अनेक मूर्तीशाळांमध्ये तयार मूर्तींची रांग लागली असून, ग्राहकांच्या पसंतीनुसार मूर्तींना अंतिम रूप दिले जात आहे.
साहित्याच्या दरवाढीचा गणेशमूर्तींवर परिणाम
मातीसह पीओपीच्या गणेशमूर्तींनाही यंदा मोठी मागणी आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत वाहतूक व ट्रान्सपोर्ट खर्च, रंग, पीओपी रेडीमेड मूर्त्या, माती तसेच अन्य साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता मूर्तीकारांकडून व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी गणेशमूर्तीशाळांमधील लगबग आणखी वाढत असून, कारागिरांच्या कुशल हातांनी साकारलेला बाप्पा लवकरच भक्तांच्या घरी विराजमान होणार आहे.