Ganeshotsav Celebration : एकाच मंडपीखाली दोन गणपतीसह गौरीचे पूजन!

देवगड किल्ला येथील गोळवणकर (सावंत) कुटुंबीय जोपासत आहेत 321 वर्षांपासूनची परंपरा
Ganeshotsav Celebration
एकाच मंडपीखाली दोन गणपतीसह गौरीचे पूजन!
Published on
Updated on

सूरज कोयंडे

देवगड ः कोकणात गणेशात्सव हा सर्वांचाच आवडता सण. हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या काही वेगळ्या प्रथा गावागावांत पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे या प्रथांमागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. देवगड किल्ला येथील गोळवणकर(सावंत) कुटुंबियांच्या घरात एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी पूजनाची परंपरा गेली 321 वर्षांपासून केली जात आहे.

एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी अशी परंपरा अपवादात्मकच आढळून येते. देवगड किल्ला भागातील गोळवणकर कुटुंबीय एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी ही परंपरा गेली तीन शतके जोपासत आहेत. हे गणेशोत्सवातील एक खास वैशिष्ट्य आहे. गोळवणकर कुटुंबीयांकडे एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी पूजनाची परंपरा सन 1704 साली सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

एक आगळावेगळा गणेशोत्सव म्हणून ओळखला जाणार्‍या या गणेशोत्सवा मागे एक वेगळीच आख्यायिका आहे. त्यावेळी गोळवणकर व मुणगेकर या कुटुंबीयांची गलबते होती. या कुटुंबातील लोक चतुर्थीदिवशी किंवा चतुर्थी अगोदर गणेशाची मूर्ती मुंबईहून गलबतामधून देवगडला आणत असत. सन 1704 साली श्री गणेशाची मूर्ती घेऊन मुंबईहून देवगडला निघालेले गलबत वादळी वारा व पावसामुळे देवगड बंदरात आले नाही. त्यामुळे गोळवणकर कुटुंबातील सर्वजण चिंताग्रस्त झाले. घरातील सगळी मंडळी गणेशाच्या स्वागतासाठी देवगड बंदराकडे डोळे लावून बसली होती. परंतु गणेशोत्सवा दिवशी गलबत न आल्यामुळे समस्या निर्माण झाली.

दरम्यान देवगडमधील सर्व लोकांनी आपआपल्या घरी श्रीगणेशाची स्थापना केली. परंतु गणेशाची मूर्ती घेऊन येणारे गलबतच दुपारपर्यंत न आल्याने गोळवणकर यांच्या घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करता आली नाही. मात्र त्यानंतर गोळवणकर कुटुंबियांनी मूर्ती घेऊन येणार्‍या गलबताची वाट न पाहता दु. 1.30 वा.च्या सुमारास देवगड येथील गणेश चित्रकार श्री. कुळकर्णी यांच्या गणेश शाळेतून श्रीगणेशाची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना केली. परंतु थोड्यावेळाने मूर्ती घेऊन येणारे वादळात अडकलेले गलबत देवगड बंदरात दाखल झाले. त्या गलबतामधील गणेश मूर्ती घरी आणण्यात आली. मात्र त्या अगोदरच घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याने आणलेल्या या मूर्तीचे आता काय करायचे? असा प्रश्न गोळवणकर कुटुंबीयांना पडला. अखेर घरातील सर्व ज्येष्ठ मंडळीनी विचारविनिमय करून ब्राह्मणाचा सल्ला घेण्याचे ठरविले. यानुसार कुटुंबातील ज्येष्ठांनी गावातील ब्राह्मणाला भेटून सल्ला घेतला असता त्या ब्राह्मणाने दुसर्‍या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करावी, असे सांगितले. तेव्हापासून गोळवणकर कुटुंबीयांच्या घरात एकाच मंडपीखाली दोन गणपती पूजनाची परंपरा सुरू झाली.

11 दिवसांच्या गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

गोळवणकर कुटुंबीयांमध्येही गणेश पूजनाबरोबरच गौरी पूजनही केले जाते. त्यानंतर गौरीचा जागर केला जातो व रात्री 12 वा. पर्यंत नवस बोलणे व फेडण्यासाठी येथे लोक येत असतात. नवसाला पावणारी गौरी म्हणून गोळवणकर कुटुंबीयांची गौरी देवगड तालुक्यात प्रसिध्द आहे. अकरा दिवसांच्या गणेशोत्सव कार्यक्रमात ऋषीचा मांड, गौरी पूजन, फुगड्या, भजन, ढोलपथक, लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. गौराईला नव्याने नवस बोलणे व केलेले नवस फेडले जातात. गोळवणकर यांची गावी, नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारी सुमारे 25 कुटुंबे या निमित्त एकत्र येतात. अशाप्रकारे एकाच मंडपीखाली दोन गणपती व गौरी पूजनाचा हा अनोखा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news