Sindhudurg : जिल्ह्यात गणेशोत्सवाची जल्लोषी सांगता

अनंत चतुर्दशीला 18 हजार गणेशमूर्तींचेे विसर्जन
Sindhudurg News
जिल्ह्यात गणेशोत्सवाची जल्लोषी सांगता
Published on
Updated on

ओरोस/ कणकवली ः ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘गणपती चालले गावाला... चैन पडेना आम्हाला...’, ‘एक-दोन-तीन- चार... गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष अन् ढोल-ताशांचा गजर करत जड अंतःकरणाने लाडक्या गणरायाला शनिवारी अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात आला.

या विसर्जन सोहळ्याने जिल्ह्याच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सांगता झाली. अजूनही जिल्ह्यात काही ठिकाणी 15, 17, 21, 39, 42 असे सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे पूजन होत आहे; मात्र 11 दिवसांच्या गणेशमूर्ती विर्सजन सोहळ्याने खर्‍याअर्थाने गणेशोत्सवाची सांगता झाल्याचे मानले जाते. जिल्ह्यात शनिवारी जिल्हाभरात मिळून 18 हजार 10 खासगी, तर 17 सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात व ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत नदी, नाले, ओढे, तलाव, खाडी आदी विसर्जन स्थळी लाडक्या बापाला निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून आला होता. कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दीड दिवस, पाचव्या व सातव्या दिवशीही जिल्ह्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी दुपारी 4 पासूनच गावागावांतील गणेशघाटांवर विर्सजनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मूर्ती विर्सजन सुरू होते. काही गणेश भक्तांनी डोक्यावर तर काहींनी सजवलेल्या वाहनांमधून मिरवणुकीने गणेशमूर्ती विर्सजनस्थळी नेल्या. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या घोषणा आणि फटाक्यांच्या आतषबाजीने विर्सजन परिसर दणाणून गेले होते. ‘निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी’ असे बोल गणेशभक्तांच्या मुखी होते.

घाटांवर गणेशमूर्ती एका रांगेत ठेवून सार्वजनिक आरती करण्यात आली. नदीपात्रात जड अंतःकरणाने गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. प्रत्येकाने आणलेल्या लाह्या, फळांच्या फोडी, खव्याचे मोदक, पेढे यांचा प्रसाद एकत्रित करून तो आलेल्या भाविकांना ‘निरोपाचा प्रसाद ’ म्हणून वाटण्यात आला.

पोलीस ठाणेनिहाय विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती

बांदा पोलिस ठाणे- 294, दोडामार्ग-1167, सावंतवाडी-805, वेंगुर्ले- 601, निवती- 849, कुडाळ-2316, सिंधुदुर्गनगरी-355, वैभववाडी-1672, कणकवली-2720, विजयदुर्ग-2033, देवगड-2990, आचरा-240, मालवण- 1908. 11 दिवसांच्या 17 सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन झाले. दोडामार्ग- 4, बांदा-, सावंतवाडी-2, वेंगुर्ला-1, कुडाळ-1, वैभववाडी-4, कणकवली-3. देवगड -1 .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news