

कणकवली : एकीकडे सिंधुदुर्गात गणपती बाप्पांचे आगमन होऊन सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले असतानाच ऐन गणेशोत्सवात सिंधुदुर्गात संततधार पाऊस सुरू आहे.
गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर अक्षरशः धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांना पूर आले होते. खारेपाटण-संभाजीनगरसह महामार्गावर तसेच वेंगुर्ले, बांदा परिसरात अनेक भागांत पावसाचे पाणी आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, खारेपाटण-संभाजीनगर येथील महामार्गाला नाल्याचे स्वरूप आले होते. वेंगुर्ले, बांदा परिसरातही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले. वेंगुर्ले तालुक्यात घरे, गोठ्यांची पडझड होऊन सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. गणेशोत्सवात पर्जन्यवृष्टीमुळे चाकरमान्यांसह गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड झाला आहे.