Sindhudurg Fort : सिंधुदुर्ग किल्ला जेटीची देवस्थान ट्रस्टकडून स्वखर्चाने दुरुस्ती

किल्ल्याच्या आत्‍मीयतेने स्थानिकांचेही श्रमदान
Sindhudurg Fort
सिंधुदुर्ग किल्ला जेटीची देवस्थान ट्रस्टकडून स्वखर्चाने दुरुस्ती
Published on
Updated on

मालवण : ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला येथे पर्यटकांना उतरण्यासाठी असलेल्या जेटीच्या परिसरातील कठडा पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेकदा किल्ले रहिवासी संघ तसेच देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केंद्रीय पुरातत्व विभागाचे लक्ष वेधूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, अनेकवेळा पर्यटकांना अपघातांना सामोरे जावे लागले होते. अखेर किल्ले होडी सेवा बंद होऊन पर्यटन हंगाम संपल्यावर किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत स्वखर्चातून जेटीच्या कठड्याची दुरुस्ती हाती घेतली.

विशेषतः पर्यटन हंगामात रोज हजारो पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत असताना जेटीवरील मोडकळीस आलेला कठडा धोकादायक बनला होता. समुद्राच्या लाटांमुळे कठड्याची मोठी झीज झाली होती. काही ठिकाणचे दगड वाहून गेले होते. त्यामुळे पर्यटकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना जेटीवरून ये-जा करताना कसरत करावी लागत होती. याबाबत स्थानिकांनी अनेकदा केंद्रीय पुरातत्व विभागाकडे निवेदने देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी होती. अखेर किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत स्वखर्चातून जेटीच्या कठड्याची दुरुस्ती हाती घेतली.

या दुरुस्ती कामासाठी किल्ला परिसरातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने श्रमदानासाठी पुढे सरसावले. कोणी लोखंडी साहित्य वाहून नेले, काहींनी दुरुस्ती कामात हातभार लावला. समुद्राच्या काठावर उन्हात काम करताना स्थानिकांच्या चेहऱ्यावर किल्ल्याबद्दलची आत्मियता स्पष्ट दिसत होती. 'पर्यटक सुरक्षित राहिले पाहिजेत आणि सिंधुदुर्गची प्रतिमा जपली गेली पाहिजे,' या भावनेतून ग्रामस्थांनी एकजुटीने हे काम पूर्ण केल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यासाठी मालवणात तब्बल ५० पोती सिमेंट, काळा दगड, खडी, वाळू होडीच्या साहाय्याने श्रमदानातून आणण्यात आली. देवस्थान ट्रस्टने याचा खर्च उचलला. समुद्रात पावसाळी वातावरण असतानाही दुरुस्तीही आवश्यक असल्याने किल्ला रहिवासी यांनी आपल्या बोटी समुद्रात घालून ही मोहीम फत्ते केली.

कायमस्वरुपी कार्यवाही व्हावी

इतिहासाचा अमूल्य वारसा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या श्रमदानातून जेटीची दुरुस्ती झाली असली, तरी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी कायम उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. स्थानिकांनी जपलेला हा वारसा आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दाखविलेली बांधिलकी सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा केवळ दगडांचा किल्ला नाही, तर मालवणकरांच्या अभिमानाचा आणि इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. मात्र, याच किल्ल्याच्या जेटीवर पर्यटक जीव मुठीत धरून ये-जा करत असल्याचे चित्र पाहून स्थानिकांच्या मनाला वेदना होत होत्या. पुरातत्व विभागाकडून वारंवार दुर्लक्ष होत असतानाही 'हा आपला वारसा आहे' याभावनेतून स्थानिकांनी स्वतः पुढे येत हा दुरुस्तीचा घेतलेला निर्णय अनेकांच्या डोळ्यांत अभिमान आणि समाधान निर्माण करून गेला.

देवस्थान ट्रस्टचे सयाजी सकपाळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, घुमडे उपसरपंच राजेश सावंत, मंगेश सावंत, सादिक शेख, समीर खवणेकर, गजानन रावले, दीपक फाटक, सचिन लोके, केदार पाडावे, हेमंत वायंगणकर, श्रीकांत कोरगावकर, दिगंबर कोरगावकर, दत्ता लोकेंसह किल्ला रहिवाशांनी यात सहभाग घेतला.

किल्ला आमचा, जबाबदारीही आमचीच

श्रमदान करताना अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि किल्ल्यावरील रहिवासी एकत्र आले. कोणाच्या हातात फावडे, कोण लोखंडी साहित्य उचलत होते. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात घामाने भिजलेले चेहरे आणि किल्ल्याबद्दलची असलेली आत्मियता पाहून 'किल्ला आमचा, जबाबदारीही आमचीच' ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. पर्यटक सुरक्षित राहवेत आणि सिंधुदुर्गची शान कायम टिकून राहवी, यासाठी स्थानिकांनी केलेले हे श्रमदान कौतुकाचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news