Sindhudurg News : दुर्मिळ ‘सप्तरंगी’च्या संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार

चौकुळ जंगलात करणार 1 हजार रोपांची लागवड ः उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी
Rare Saptarangi conservation
सप्तरंगी औषधी वनस्पती रोपं नर्सरीमध्ये तयार करण्यात आली आहेत.pudhari photo
Published on
Updated on

सावंतवाडी ःसिंधुदुर्ग वन विभागाने दुर्मिळ वनस्पती आणि झाडांच्या संवर्धन व रोपवनाला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून चौकुळ येथील जंगलात येत्या ऑगस्ट महिन्यात बहुमोल औषधी वनस्पती ‘सप्तरंगी’ च्या सुमारे 1 हजार रोपांचे रोपण केले जाईल, अशी माहिती जिल्हा उपवनसंरक्षक एम.नवकिशोर रेड्डी यांनी दिली. पश्चिम घाटातील महत्त्वाची औषधी वनस्पती आहे.‘सप्तरंगी’ ही प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळणारी एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. भविष्यात औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज ओळखून वन विभागाने या लागवडीचे नियोजन केले असल्याचे श्री.रेड्डी यांनी सांगितले.

मधुमेहावरील प्रभावी औषध:

भारतात दिवसेंदिवस मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे होमिओपॅथी,अ‍ॅलोपॅथीकडे रुग्णांना वळावे लागते. मात्र आयुर्वेदीक औषधांमध्ये पुरातन काळांपासून मधुमेहावर मात करणारी औषधी गुणधर्म असलेली ‘सप्तरंगी’ परीचीत आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो, त्या भागात ही वनस्पती तग धरुन राहू शकते. त्यामुळे ही वनस्पती कमी पाऊस पडणा-या ठिकाणांवर हमखास दिसून येते. कर्करोगावरही सप्तरंगी झाडाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे या वृक्षाची अवैध तोड झाली आहे. अलिकडच्या काळात ‘सप्तरंगी’ वनस्पती व्यापारी वनस्पती म्हणून पुढे आली आहे.

सप्तरंगीचा उपयोग मधुमेहावर औषध म्हणून केला जातो. महाराष्ट्रात काही ठिकाणी तिला ‘इंगळी’ किंवा कोकणी भाषेत ‘निसळ बोंडी’ या नावानेही ओळखले जाते, असे औषधी वनस्पती जाणकारांनी नमूद केले आहे.

सप्तरंगी हिला सॅलॅसिया चायनेसीस असे शास्त्रीय नाव आहे.तिचा सरळ किंवा वेडावाकडा वाढणारा वृक्ष अथवा मोठे काष्ठयुक्त झुडुप अंदमान बेटांसहीत भारतात सर्वत्र आढळते. समुद्रकिनारी, नदीनाल्यांच्या काठी,जंगलात,समुद्रसपाटीपासून 750 मी.उंचीपर्यंत जोमाने वाढते.तिची पाने अंडाकृती कुंतसम भाल्यासारखी तर फुले पिवळसर असून झुपक्यांनी एकत्र फुलतात. फळ लहान गोलसर असते.ते पिकल्यावर लाल होते.तिची पिकलेली फळे खाल्ली जातात.भारतीय वैद्ययक पध्दतीत सप्तरंगींच्या मुळांचा उपयोग मधुमेहाविरोधात करतात. वैज्ञानिक चाचणीमध्ये त्याचा परिणामकारकपणा सिध्द झाला आहे. या वनस्पतीत डायकिटोने, स्निग्धाशयुक्त द्रव्य,रबर,डल्सी डॉल, मॅन्जीफेरीन, फलोबॅटॅनिज,ग्लूकोसायडीन, टॅनिन आदी जीवनसत्वे यात आहेत.

मधुमेहाच्या आजारावर हल्ली सप्तरंगीचे उत्पादन महत्तवाचे ठरले आहे.यासंबंधी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागातील डॉ.अंकुर पटवर्धन,मकरंद पिंपुटकर आणि राधिका जोशी या संशोधकांचे सप्तरंगी वनस्पतीतील मधुमेहांवरील नियंत्रण ठेवणार्‍या गुणधर्मावरील संशोधन प्रसिध्द झाले आहे.

सप्तरंगीचे औषधी गुणधर्म आणि उपयोग:

मधुमेह नियंत्रणासाठी: सप्तरंगी ही मधुमेहावर अत्यंत गुणकारी मानली जाते. तिच्या मुळांमध्ये, खोडात आणि पाना-बियांतही औषधी गुणधर्म असल्याने मधुमेहावरील औषधांमध्ये तिचा वापर होतो. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की सप्तरंगीच्या मुळांमध्ये आढळणारे गुणधर्म खोडातही असतात, त्यामुळे झाड न तोडता खोडाचा वापर करता येतो.सप्तरंगीच्या बियांची उगवण क्षमता कमी असल्याने आणि तिची वाढ संथ गतीने होत असल्याने ती दुर्मिळ होत आहे. मधुमेहावरील उपचारात तिची जास्त मागणी असल्याने औषधांच्या दुकानात आणि बाजारात ती सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या औषधी वनस्पतीचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, वन विभागाने यावर लक्ष केंद्रित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news