Nitesh Rane : वाडीवस्तींची जातीवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग राज्यात पहिला

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन
Nitesh Rane
Nitesh Rane
Published on
Updated on

देवगड :­ वंचित समाजाचे प्रश्न तसेच निधीअभावी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सुमारे ९ कोटींचा निधी जिल्हा नियोजन, समाजकल्याण आदी विविध योजनांच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील मागासवर्गीय वाडीवस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा क्रांतिकारक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी पडेल येथील धम्म मेळाव्यात व्यक्त केले.

पडेल कॅन्टीन येथील साई गणेश मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री राणे बोलत होते. हा मेळावा देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ-विजयदुर्ग शाखा, पंचशील महिला मंडळ (मुंबई / ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, प्रमुख अतिथी म्हणून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर, स्वागताध्यक्ष डी. के. पडेलकर, भन्तेजी पारा बुद्धिश्री, भन्तेजी बुद्ध मित्र थेरो, भन्तेजी राहुल मित्र थेरो, मन्तेजी प्रज्ञा बोधी, भन्तेजी बुद्धपाल थेरो, भन्तेजी अनुराधा, पं. स. सभापती गणेश राणे, जि. प. सदस्य संजय बोंबडी, पं.स.सदस्य रवींद्र तिर्लोटकर, तहसीलदार रमेश पवार आदी उपस्थित होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी राज्यमंत्री भाई गिरकर हे कायम प्रयत्नशील असतात. येथील विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.

डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले, देशात आरक्षण वर्गीकरणाचे काम सुरू झाले असून महाराष्ट्रात असे वर्गीकरण करण्यास आपला विरोध आहे. महाराष्ट्र प्रगत आहे. महापुरुषांच्या विचारांबर देश चालतो. महापुरुषांना भाषा, जातीपातीमध्ये विभागू नका. आरक्षणामुळे समाज विभागला जातो. समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. यात कोणत्याही समाजाचा फायदा होणार नाही. नीतेश राणे हे कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित करावा. राज्य शासनाने योग्य निर्णय घ्यावा, भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार समाजात अधिक व्यापक करण्याची गरज आहे. सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपावा, सम्राट अशोकांचा इतिहास गौरवशाली आहे. परंतु तो दडपलेला आहे. हा इतिहास जागृत करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

१५ मे पासून होणाऱ्या जनगणनेसाठी धर्म व जातीच्या कॉलममध्ये पाली भाषेचा उपयोग करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभेने केली आहे. आपल्या शेड्युल कास्टची संख्या कमी झाली तर समाजकल्याणचा १२ हजार कोटींच्या निधीसह इतर योजनांच्या माध्यमातून मिळणारा फंड कमी होऊन समाजाच्या अधोगतीला सुरुवात होईल. त्यामुळे यावर विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच त्यांनी २०२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार म्हणून १०० वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून हे वर्ष आनंदाचे असल्याचे सांगितले.

भाई गिरकर म्हणाले, गिर्ये येथे आम्ही उभ्या केलेल्या बुद्ध विहारामध्ये वर्षाचे सर्व दिवस बुद्ध वंदना होते. गिर्ये गाव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करीत असल्याचे सांगितले. डी. के. पडेलकर यांनी मनोगत व्यक्त केले. भाई गिरकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा बुद्धमूर्ती व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. आभार अर्पिता साळुंखे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news