

सावंतवाडी ः महावितरणच्या विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर आंबा-काजू बाग जळून खाक झाल्यानंतरही मदत न मिळाल्याने सावंतवाडी येथे बागायतदारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. केशव चौकेकर आणि आप्पा चौकेकर यांनी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
29 फेब्रुवारी 2024 आणि 6 मे 2025 रोजी सलग दोन वर्षे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चौकेकर यांच्या पाच एकरमधील बाग पूर्णतः जळाली. या दुर्घटनांमुळे सुमारे 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र महावितरणकडून केवळ 1 लाख 87 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मिळाल्याने बागायतदारांनी ती रक्कम अपुरी व अन्यायकारक असल्याचे सांगितले. आमचे एकमेव उपजीविकेचे साधन शेती आहे. योग्य नुकसानभरपाई द्या किंवा नोकरी द्या, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच जीर्ण झालेली विद्युत यंत्रणा तातडीने दुसऱ्या मार्गाने वळवावी, अशीही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. ठोस निर्णय होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.