

कणकवली : गतवर्षी १५ मे पासूनच मान्सूनपूर्व पावसास सुरुवात झाली होती. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस झालेला नाही. परिणामी गेल्या काही दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून बळीराजासह सर्वांनाच आता मान्सूनची प्रतीक्षा आहे. आता कधीही पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची खते आणि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीची मशागतीची कामेही आता आटोपली असून बळीराजा पेरणीसाठी आता सज्ज झाला आहे.
गेल्या काही वर्षापासून सातत्याने पावसाचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. गतवर्षी तर १०-१२ मे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने धूमशान घातले होते. त्यानंतर अधूनमधून पाऊस पडत राहिला आणि मे च्या अखेरीस मान्सूनही कोकणात दाखल झाला होता. यंदा मात्र अद्यापही मान्सूनपूर्व पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. गेल्या काही दिवसापासून ढग दाटून येतात. वातावरणात प्रचंड दमटपणा असतो. त्यामुळे उकाडाही वाढला आहे.
सकाळच्या सत्रात तर पाऊस आता पडणार असे चित्र असते. मात्र दुपारनंतर वातावरण बदलते, चांगले ऊन पडते आणि वाराही वाहू लागतो. हे सारे वातावरण पाहता आता कधीही मान्सूनपूर्व पावसास सुरुवात होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाने मशागतीची कामे आटोपून आता तो पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि आखाती देशातील युद्धामुळे इंधन टंचाईचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. त्यामुळे खते आणि बियाणेही महागली आहेत. विशेष म्हणजे कोकणातील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळला असताना नांगरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉवर ट्रिलरला पेट्रोल तरी पुरेसे मिळणार का याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगा लावलेले चित्र पाहायला मिळते. कोकणात आता पाऊस सुरू होईल, शेतीची कामे सुरू होतील; पण पेट्रोल, डिझेलचे काय, हा प्रश्नच आहे.
टंचाईग्रस्त वाड्याही आहेत पावसाच्या प्रतीक्षेत
सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून जाहीर झालेला असला तरी मार्च, एप्रिलनंतर जिल्ह्यातील अनेक वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरवर्षी प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारण आराखडे तयार केले जातात. त्यानुसार कामेही होतात. मात्र जलस्रोतच आटत असल्याने योजना असूनही त्याचा लाभ होत नाही. विशेषतः डोंगराळ भागातील वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागतो. अशा वाड्यांनाही आता पावसाची मोठी प्रतीक्षा आहे.