

ओरोस ः अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगळवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे मंगळवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेत अवकाळी व मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या शेती, बागायतीच्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानीची भरपाई तत्काळ मिळावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्गात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जांभूळ आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच उन्हाळी भूईमूग, मूग, चवळी, कलिंगड, मिरची आदी शेतीही शेतातच कुजून गेल्याने उत्पादक शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय वादळी पावसामुळे घरे, गोठ्यांवर झाडे पडून नुकसान झाले.
या अस्मानी संकटात शासनाने तात्काळ मदत करावी अशी शेतकरी आस बाळगून आहे. तरी आपण नुकसानी संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवून शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे
प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूणकर, विनायक मेस्त्री, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवीण मोरे, वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, व्ही. के. सावंत, बाबू गवस, सावंतवाडी सेवादल अध्यक्ष संजय लाड, सुभाष नाईक आदी उपस्थित होते.
कोकमचा हंगाम तर पाच-सहा मे नंतर सुरू होतो आणि तो 8 ते 10 जून पर्यंत चालतो. त्यातच या वेळेस प्रतिकूल हवामानामुळे कोकमचे उत्पादन थोडे उशिरा आले होते. मात्र ऐन बहराच्या हंगामातच अवकाळी पाऊस सुरू झाल्याने कोकमची फळे जमिनीवर पडून वाया गेली. यावर्षी कोकमचे 5 टक्केही उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे कोकम प्रक्रिया उद्योग आणि त्यावर आधारित उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. तसेच कोकम आगळ, कोकम सरबत बनविणार्या गृह उद्योगांवरही मोठा परिणाम होणार आहे.