

देवगड ः देवगड तालुक्यातील पर्यटनाचा सेतू ठरलेल्या तारामुंबरी-मिठमुंबरी पूल पूर्ण होऊन सात वर्षे झाली. या पुलावरून खासगी वाहतूकही सुरू झाली. मात्र एस्टी वाहतूक सुरू झाली नव्हती, दरम्यान एस्टीच्या विभागीय वाहतूक निरीक्षकांनी दोन दिवसांपूर्वी या पुलाचा व मार्गाचा सर्व्हे करून त्याचा अहवाल विभाग नियंत्रकांना दिला आहे. देवगड तालुक्याच्या दक्षिण भागासाठी सोयीच्या ठरणार्या या पुलावरून आता लवकरच एसटी वाहतूक सुरू होणार आहे. याबाबत प्रवासी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
देवगड तालुक्यातील पर्यटनाचा सेतू ठरणार्या तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाचे बांधकाम मे -2017 मध्ये पूर्ण झाले. त्या नंतर 17 मे 2017 रोजी आ. नीतेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होवून पूल वाहतुकीस खुला झाला. तेव्हा पासून गेली 7 वर्षे या पुलावरून खासगी वाहतूक सुरू आहे. सहलीच्या एस्टी बसेसही या मार्गावरून सुरू आहेत. एक वर्षे देवगड आगारानेही कुणकेश्वर यात्रेसाठी मिडीबस सेवा या मार्गावरून सुरू केली होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्याचा दृष्टीने सोयीची एस्टी सेवा अद्याप सुरू झाली नव्हती. हा मार्ग एसटी वाहतुकीस योग्य असल्याचे सा. बां. विभागाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग एस्टी विभागीय कार्यालयाचे वाहतूक निरिक्षक लहू सरवदे यांनी व देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी मार्गाचा सर्व्हे केला. याचा अहवाल त्यांनी विभागीय वाहतूक अधिकार्यांना दिला आहे. सर्व्हेमध्ये रस्त्याची स्थिती, आजुबाजूची लोकवस्ती, अंतर, त्याप्रमाणे तिकीट, स्टॉप यांचा सर्व्हे करून या सर्व माहितीचा अहवाल देण्यात आला आहे. सध्या खाकशीमार्गे कुणकेश्वर, कातवण, मिठबाव, मोर्वे आदी ठिकाणी जाणार्या फेर्यांपैकी कोणत्या फेर्या या मार्गावरून सुरू करणे सोयीचे ठरेल याबाबतची माहिती देवगड आगाराकडून देण्यात येणार आहे. त्यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या खाकशी मार्गे कुणकेश्वर व तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामार्गे कुणकेश्वर अंतर यामध्ये जवळपास 10 किमी.चा फरक असून तारामुंबरी-मिठमुंबरी पुलामार्गे वाहतूक सुरू झाल्यास प्रवाशांचा तिकीटखर्च निम्मा होणार आहे. याशिवाय वेळही कमी होणार आहे.
एस्टी वाहतूक विभागाने 7 जानेवारी रोजी केलेल्या सर्व्हेनुसार देवगड-तारामुंबरी नाका, तारामुंबरी-मिठमुंबरी पूल, बागवाडी, मिठमुंबरी ग्रामपंचायत, मिठमुंबरी -मुंब्रादेवी मंदिर, कुणकेश्वर तळेवाडी मार्गे कुणकेश्वर असे प्रवासाचे टप्पे असून या मार्गे देवगड ते कुणकेश्वर मंदिर 7.7 किमी अंतर होत आहे. सर्व्हेचा अहवाल सादर केल्यानंतर कोणत्या फेर्या या मार्गावरून सुरू करणार याबाबतची माहिती देवगड आगाराकडून देण्यात येणार असून त्यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा फेब्रुवारी माहिन्यात असून या यात्रेपूर्वी तारामुंबरी-मिठमुंबरी पुलावरून वाहतूक सुरू व्हावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.