Sindhudurg News| जुन्याच विहिरीला रंग देऊन १० ते १५ लाखांचा अपहार!

आरोंदा जलजीवन मिशन जलार्पण कार्यक्रमावरून उबाठाचे रूपेश राऊळ यांचा आरोप
 Crime News
अपहार
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी : जलजीवन मिशन अंतर्गत आरोंदा येथे महात्मा गांधी जयंती निमित्त झालेल्या जलार्पण कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता तसेच अनेक हरकती डावलून हा कार्यक्रम उरकण्यात आला. विशेष म्हणजे, नवीन विहीर न बांधता २००९ मधील जुन्याच विहिरीची रंगरंगोटी करून नवीन दाखवत तब्बल १० ते १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असा सनसनाटी आरोप उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकड लेखी तक्रार सादर करून दोषी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

रुपेश राऊळ म्हणाले, आरों-जाधववाडीसाठी २००९ मध्ये 'यशवंत ग्राम समृद्धी योजने'तून ९ लाख रुपये निधी खर्चून विहीर बांधण्यात आली होती. जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर बांधणे अपेक्षित असताना ती न बांधता, याच जुन्या विहिरीवर रंगरंगोटी करून नवीन विहीर म्हणून जलार्पण सोहळा पार पाडण्यात आला. "नवीन विहीर नक्की गेली कुठे?" असा सवाल करत या संपूर्ण प्रकरणात १० ते १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा दावा श्री. राऊळ यांनी केला.

आरोंदाचे माजी उपसरपंच आबा केरकर, संजीव पेडणेकर, बबन नाईक आणि सिद्धेश नाईक या स्थानिक लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाबाबत आधीच अनेक हरकती नोंदवल्या होत्या. तरीही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न देता आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जि. प. सदस्य व सभापतींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याचे श्री. राऊळ म्हणाले.

रुपेश राऊळ म्हणाले, "सावंतवाडी नगरपरिषद असो की आरोंदा ग्रामपंचायत, या संस्था सध्या भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत. सावंतवाडी नगरपालिकेत केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाच्या सभापतीला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला, हीच परिस्थिती आरोंदा ग्रामपंचायतीतही आहे. या प्रकरणात केवळ सभापतीच नव्हे, ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात यावी तर या अपहाराला खतपाणी घालणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. उबाठा शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख राजू शेटकर, अशोक धुरी, मच्छीमार नेते गोकुळदास मोटे, माजी उपसरपंच आबा केरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news