Sindhudurg : कार घेऊन देण्याच्या बहाण्याने वृद्धाला 5 लाखांचा गंडा

कणकवलीतील घटना ः संशयितावर फसवणुकीचा गुन्हा
 Fraud News
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

कणकवली ःलॉजमध्ये झालेल्या ओळखीनंतर विश्वास संपादन करुन आपण मुंबईत स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफीसर असून बँकेचे कर्ज थकवलेल्या गाड्यांच्या लिलावातील इनोव्हा कार कमी किमतीत घेवून देतो, असे सांगत संशयित प्रियंक एस. आंगणे (50,रा. आंगणेवाडी) याने रतनकुमार मनोज सावंत (वय 74 ,रा. भिरवंडे, बिवणेवाडी, सध्या रा.नवी मुंबई) यांची 4 लाख 80 हजार रोख रक्कम घेवून फसवणूक केली. याप्रकरणी प्रियंक आंगणे याच्याविरुध्द कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 11 मार्च ते 18 मार्च 2025 या मुदतीत कणकवलीत घडली. फिर्यादी रतनकुमार सावंत हे सेवानिवृत्त असून इंजिनिअर आहेत. त्यांची वैभववाडी-जांभवडे येथे शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी ते अधुनमधुन गावी येतात. शेती कामासाठी 10 मार्चला ते गावी आले होते. ते कणकवलीतील हॉटेल पूजा लॉजवर राहिले होते. त्यावेळी त्यांची संशयित प्रियंक आंगणे याच्याशी ओळख झाली. त्याने आपले गाव आंगणेवाडी असे सांगितले. तसेच आपला मोबाईल नंबर देवून विश्वास संपादन केला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईत मुख्य कार्यालयात आपण प्रोबेशनरी ऑफिसर आहे असे सांगितले. त्यावेळी श्री. सावंत यांनी आपल्याला शेती कामासाठी गावी जाण्याकरीता कारची आवश्यकता आहे असे सांगितले. त्यावर संशयित आंगणे याने बँकलोन थकलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्री लिलावामध्ये आपणास कमी किमतीत गाडी घेवून देतो असे सांगितले. यावर श्री. सावंत यांचा विश्वास बसला. 11 मार्च रोजी ते पूजा लॉजमधूमन एसटी स्टँडसमोरील हॉटेल उत्कर्षा येथे राहायला गेले. त्यानंतर श्री. सावंत यांनी 12 मार्च रोजी कणकवलीतील आयसीआयसीआय बँकेत जावून सेल्फ चेकद्वारे प्रथम दीड लाख आणि नंतर 2 लाख 40 हजार असे एकूण 3 लाख 90 हजार रुपये काढले आणि संशयित आंगणे याला दिले. त्याने पुन्हा आणखी पैसे लागतील असे सांगितल्यानंतर श्री. सावंत यांनी 18 मार्च रोजी त्याला बँकेतून सेल्फ चेकद्वारे 90 हजार रुपये काढून दिले अशी एकूण 4 लाख 80 हजार अशी रक्कम संशयित आंगणे याला दिली.

त्याने या गाड्यांच्या लिलाव वाशी डेपो येथे केला जातो, तेथे तुम्हाला गाडी घेण्यासाठी बोलवेन असे सांगून तो मुंबईला निघून गेला. दरम्यान त्यानंतर श्री. सावंत यांनी संशयिताला वारंवार फोनद्वारे आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून गाडीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने आपल्या आईचे ऑपरेशन झाले आहे, मुलगी खडकवासला पुणे एनडीए येथे असून ती आजारी आहे, अशी कारणे सांगून टाळाटाळ केली. मात्र वारंवार सांगूनही संशयिताने गाडी घेवून दिली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी फिर्यादी रतनकुमार सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रियंक आंगणे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news