

आरे : आरे गावातील बौद्धवाडी येथील चार मित्र रविवारी (४ ऑक्टोबर) दुपारी आरे नदीपात्रात पोहण्यासाठी गेले असता १९ वर्षीय राहुल नयनकुमार कुडाळकर याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग दीपक आरेकर (२२), विराज रतन कांबळे, साईनेश दीपक कांबळे आणि राहुल नयनकुमार कुडाळकर हे चौघेही आपल्या वाडीशेजारी असलेल्या आरे नदीपात्रात दुपारी सुमारे २ वाजता पोहण्यासाठी गेले होते. यावेळी राहुलला नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. श्वास गुदमरल्याने तो पाण्यात दिसेनासा झाला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
राहुलचा मित्रांनी तत्काळ नदीपात्रात शोध सुरू केला. सुमारे चार तासांच्या शोधानंतर संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नदीतील खडक व झाडीमध्ये राहुल आढळून आला. मित्रांनी त्याला तातडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून राहुलला मृत घोषित केले. या घटनेमुळे आरे बौद्धवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.