

सिंधुदुर्ग : सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासुर यांनी पदभार स्वीकारला. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक या सर्व पदांवर आता महिला अधिकारी असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेत महिलाराज आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला आणि त्या धडाडीने व कार्यक्षमपणे काम करत आहेत. जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यादेखील वर्षभरा पूर्वीपासून सक्षम पणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुकन्या आहेत. गेली दोन वर्ष त्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदी ही डॉक्टर सई धुरी यांनी कार्यक्षमपणे आरोग्य यंत्रणा सांभाळली आहे. असे असताना आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदीही डॉक्टर अपूर्वा यांच्या रूपाने सोमवारी महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत महिलाराज असल्याचे पुढे आले आहे.
इतर कोणत्याही भागापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिलांचा सन्मान अधिक प्रमाणात केला जातो. इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात महिला हिरीरीने भाग घेतात. राजकारणातही अनेक महिला यशस्वीपणे काम करत आहेत. मतदार यादीतही स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे. अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश पदांवर महिला अधिकारी काम करत असल्यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांना मिळणारा सन्मान अधोरेखित झाला आहे.
महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायी चित्र
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत हा अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद योगायोग पाहायला मिळत आहे.निर्णयक्षमता, संवेदनशीलता, कार्यक्षमता आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर महिला आज प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली ठळक छाप उमटवत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही प्रशासकीय रचना म्हणजे महिला सक्षमीकरणाचे एक सुंदर आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.