

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विशेषतः दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला हत्तींचा उपद्रव आता शिगेला पोहोचला आहे. या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. दीपक केसरकर यांनी कंबर कसली असून, राज्याच्या वनमंत्र्यांकडे तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हत्तींच्या कळपाने शेती आणि बागायतीचे अतोनात नुकसान केले आहे. मानवी जीवनालाही धोका निर्माण झाला असून, हवालदिल झालेला शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या पार्श्वभूमीवर आ. केसरकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून वन विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली आहे.
आ.केसरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की,3 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीत काही उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या, त्यावर अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी आहे.हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी प्रचंड मानसिक तणावात असून त्यांच्या नुकसानीची दखल घेणे गरजेचे आहे.या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करावे, जेणेकरून जमिनीवरील वास्तव मांडता येईल. नेहमीप्रमाणे केवळ पंचनामे आणि तोकडी मदत नको, तर हत्तींना रोखण्यासाठी सौर कुंपण, हत्ती प्रतिबंधक चर किंवा इतर प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या उच्चस्तरीय बैठकीतून दोडामार्गच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.