Sindhudurg News : हत्तींच्या हल्ल्यातून सुदैवानेच बचावले शेतकरी!

घोटगे गावातील घटना; काजू बागेत कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर काळाचा थरार
Sindhudurg News
हत्तींच्या हल्ल्यातून सुदैवानेच बचावले शेतकरी!
Published on
Updated on

दोडामार्ग : घोटगे गावात काजू बागेत कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर अक्षरशः हत्तीरूपी ‌‘यम‌’ उभा ठाकला. सहा हत्तींचा कळप, त्यात ‌‘गणेश टस्कर‌’ आघाडीवर आणि समोर होते निष्पाप शेतकरी! काही क्षणांसाठी मृत्यूचे सावटच दाटून आले होते. मात्र प्रसंगावधान, धैर्य आणि दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली व शेतकरी यातून बचावले.

या थरारक प्रसंगात दोन महिला शेतकरी जीव वाचवण्यासाठी पळताना पडल्याने जखमी झाल्या. तर 80 वर्षीय आत्माराम महादेव दळवी यांना धावता येत नसल्याने ते हत्तीच्या तावडीत सापडणार, इतक्यात त्यांचे सुपुत्र भरत दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता वडिलांना उचलून घेतले आणि काजूच्या झाडाझुडपातून पळ काढला. यावेळी हत्तींच्या कळपाने जोरदार चित्कार करत बागेत धुडगूस घातला. झाडाझुडपांचा अडथळा आल्याने संतप्त टस्कराने काजूच्या झाडावर सोंड आपटून झाडाचे मोठे नुकसान केले. मात्र हाच क्षण साधत भरत दळवी यांनी वडिलांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी भावनिक प्रतिक्रिया आत्माराम दळवी व भरत दळवी यांनी व्यक्त केली.

दीड महिन्यापासून गणेश टस्कराचा गावात वावर

घोटगे परिसरात मागील दीड ते दोन महिन्यांपासून गणेश टस्करासह सहा हत्तींचा कळप मुक्तपणे फिरत आहे. सध्या काजू हंगाम सुरू असल्याने शेतकरी कुटुंबासह बागेत काम करत आहेत. अशा वेळी अचानक हत्तींचा शिरकाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी भरत दळवी यांचे संपूर्ण कुटुंब, महिला कामगारांसह नेहमीप्रमाणे काजू वेचत असताना अचानक हत्तींचा कळप त्यांच्या समोर येऊन उभा ठाकला. क्षणात आरडाओरडा, जीवाच्या आकांताने पळापळ आणि मृत्यूशी दोन हात करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी जीवाच्या आकांताने मिळेल त्या मार्गाने पळ काढला. मात्र वयाच्या मानाने धावता न आल्याने आत्माराम दळवी हे हत्तीच्या तावडीत अडकणार असते. गणेश टस्कर अगदी दहा ते पंधरा मीटरवर पोहोचताच आत्माराम दळवी यांचे सुपुत्र भरत दळवी यांनी धीटाईने त्यांना वाचवले. या संपूर्ण घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

दुसऱ्या दिवशीही हत्ती त्याच परिसरात

गुरुवारी सकाळपासून वनविभागाची हाकारी टीम घटनास्थळी पहारा ठेवून होती. यावेळी ड्रोनच्या मदतीने हत्तींचा मागवा घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र हत्तींचे लोकेशन मिळत नव्हते. सायंकाळी 4.30 वा.च्या सुमारस गावातील मंदिराच्या मागच्या बाजूस हत्तींचे लोकेशन मिळाले. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी भरत दळवी व कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news