

दोडामार्ग ः आंबेली-कोनाळकरवाडी परिसरात बुधवारी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सकाळच्या वेळेस दोडामार्ग ते तिलारी राज्य मार्गावरून जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर व हिरो पॅशन प्लस या दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर दोन्ही स्वार रस्त्यावर कोसळले होते. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातात स्प्लेंडरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून पुढील टायर मॅगव्हीलसह तुटला. तर शॉकॲब्झॉर्बर बेंड झाले आहेत. पॅशन प्लस गाडीच्या दर्शनी भागाचाही चक्काचूर झाला आहे.