Sindhudurg News : सलग चौदाव्यांदा सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन

बारावी परीक्षेचा निकाल ९५.९४ टक्के : कुडाळ हायस्कुलची गायत्री बागलकर जिल्ह्यात प्रथम
Sindhudurg News
गायत्री बागलकर , दत्तराज पै, वैदेही पालकर, शुभ्रा प्रभुगावकर
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. कोकण बोर्डाने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

कोकण बोर्डाचा निकाल पंधराव्यांदा राज्यात सर्वाधिक ९४.१४ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सलग चौदाव्यांदा राज्यात सर्वाधिक ९५.९४ टक्के लागला आहे. सिंधुदुर्गात कुडाळ हायस्कूल ज्यु. कॉलेजची गायत्री विवेकानंद बागलकर ही वाणिज्य शाखेत ९५.६७ टक्के गुण मिळवून प्रथम, तर याच शाखेचा आरपीडी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा दत्तराज शैलेश पै हा ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि कट्टा वराडकर ज्यु. कॉलेजची वैदेही पालकर ही ९४.८६ टक्के मिळवून तृतीय आली आहे.

तसेच ओरोस डॉन बॉस्को ज्यु. कॉलेजची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी शुभ्रा युगलकिशोर प्रभुगावकर हिने ९४.८३ टक्के गुण मिळवून चौथा आणि कुडाळ ज्यु. कॉलेजची पूनम दिनेश दळवी हिने ९४.१७ टक्के मिळवून जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, गुणवत्‍तेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

पंधरा वर्षे सातत्याने कोकण बोर्डाची सर्वाधिक निकालाची घोडदौड कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोकण बोर्डामध्ये यंदा बारावी परीक्षेसाठी २३ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील २२,८८८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यातून २१,५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १०,५२६ मुलगे आणि ११,०२२ मुली असून दरवर्षीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. गतवर्षी कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के, तर सिंधुदुर्गचा निकाल ९८.७४ टक्के लागला होता. यंदा सिंधुदुर्गच्या निकालात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे.

यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी ८,०२२ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील ७,९७३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यामध्ये ७,६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२४ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.७५ टक्के आहे. निकालात यंदा काहीशी घट झाली असली, तरी उत्‍तीर्णतेत मुलींची आघाडी कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news