

ओरोस ःसिधुदुर्ग जिल्ह्याचा 2026-27 या पुढील वर्षासाठी शासनाकडे पाठविलेल्या 600 कोटींच्या प्रारूप आराखड्यातील 307 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असताना महाराष्ट्र राज्यात चालू आर्थिक वर्षाचा 100 टक्के निधी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्ह्याने नंबर वन पटकावला आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीत हे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी 100 टक्के निधी वितरित करणारा सिंधुदुर्ग जिल्हा एकमेव जिल्हा असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
निधी वितरणामध्ये सिंधुदुर्गनंतर दुसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्हा असून त्यांचा 99.99 टक्के निधी वितरित झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर परभणी, चौथ्या क्रमांकावर पुणे, पाचव्या क्रमांकावर चंद्रपूर, सहाव्या क्रमांकावर मुंबई असून चौदाव्या क्रमांकावर शेजारचा कोल्हापूर जिल्हा आहे. त्यानंतर पंधराव्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्याचा क्रमांक निधी खर्चावर लागतो.
सिंधुदुर्गचा जिल्हा वार्षिक आराखडा दरवर्षी आता वाढू लागला आहे. त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे सातत्याने पाठपुरावा करीत असून वार्षिक आराखड्याबरोबरच विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 2026-27 साठीचा जिल्हा वार्षिक आराखडा शासनाला पाठवण्यासाठी 11 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्यात आली होती. पुढील वर्षासाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा आराखडा या सभेमध्ये मंजूर करण्यात येऊन शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता शासनाने 307 कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे.