

ओरोस : राज्यातील नर्सेसवर लादण्यात येणाऱ्या प्रशासकीय बदल्यांविरोधात नर्सेस संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नर्सेस या आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, त्या दिवस-रात्र रुग्णसेवा प्रामाणिकपणे पार पाडत असतात. मात्र, शासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रशासकीय बदल्यांमुळे नर्सेसमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा निषेध म्हणून गुरुवारी जिल्हा नर्सेस संटनेने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक आंदोलन केले.
नर्सेसची हॉस्पिटलअंतर्गत नियमानुसार दर तीन वर्षांनी बदली होत असते. त्यामुळे स्वतंत्रपणे प्रशासकीय बदल्यांचा हट्ट शासनाने का धरला आहे, असा सवाल नर्सेस संघटनेचा आहे. तसेच, रुग्णालयातील आर्थिक व्यवहारांमध्ये नर्सेसचा कोणताही सहभाग नसताना त्यांच्यावर प्रशासकीय बदल्यांची कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. बहुसंख्य नर्सेस महिला असून, अचानक होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांचे कौटुंबिक जीवन, मुलांचे शिक्षण, संसार यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे बदल्यांचा निर्णय तत्काळ रद्द करून फक्त विनंती बदली व तक्रार बदली प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.