

देवगड ः देवगड-जामसंडे शहराचा पाणीप्रश्न अखेर गुरुवारी पेटला. वारंवार उद्भवणार्या या पाणीप्रश्नावर आक्रमक झालेल्या देवगड- जामसंडेमधील व्यापारी व ग्रामस्थांनी न. पं. कार्यालयावर धडक देत नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना जाब विचारला. पाणीप्रश्न सुटत नसेल तर नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करा, या मागणीवर व्यापारी व ग्रामस्थ ठाम राहिले.
विविध प्रश्नांचा भडिमार करीत पाणी, कचरा, सांडपाणी या प्रश्नांवरून धारेवर धरले. अखेर मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी चार दिवसांत पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करतो व पाणीप्रश्नावर तोडगा काढतो, असे आश्वासन दिले. चार दिवसांत तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी दिला.
देवगड-जामसंडेचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून पाईपलाईन फुटणे नित्याचेच झाले आहे, तर पाणी पातळी घटत असल्याने एप्रिलपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रश्नावर आक्रमक झालेल्या व्यापारी व ग्रामस्थांनी गुरूवारी थेट न. पं. कार्यालयावर धडक दिली व नगराध्यक्षा मुख्याधिकारी यांना जाब विचारला. नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, मुख्याधिकारी सूरज कांबळे, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी तर व्यापारी व ग्रामस्थांच्यावतीने देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सौ.प्रियांका साळसकर, अॅड.कौस्तुभ मराठे, चारूदत्त सोमण, मधुकर नलावडे, ज्ञानेश्वर खवळे, बाळा लळीत, रवींद्र तारकर,दयाळ गावकर, उल्हास मणचेकर, दयानंद पाटील, विजय कदम, आनंद कुळकर्णी, आप्पा अनभवणे, अविनाश उर्फ राजू सावंत, चंद्रहास मर्गज, आनंद रामाणे, गिरीश धोपटे, रवींद्र कोयंडे, शामसुंदर खेडेकर,धर्मराज जोशी, निलेश कारेकर, नगरसेवक व्ही. सी. खडपकर आदी उपस्थित होते.
पाणीप्रश्न गेली कित्येक वर्षे सुरू आहे. आता हा प्रश्न गंभीर बनला असून ज्या दहिबांव नळयोजनेवरून पाणीपुरवठा केला जातो, ती योजनाच 30 वर्षापूर्वीची असून ती जीर्ण झाली आहे. यामुळे वरचेवर पाईपलाईन फुटून पाणीप्रश्न गंभीर होत आहे. या नळयोजनेच्या दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाख रूपये रकमेला तांत्रिक मान्यता मिळाली पण पुढे काय झाले? निधी मंजूर होवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात कधी होणार? असा सवाल व्यापारी व ग्रामस्थांनी केला. न. पं. प्रशासनाकडून दोन दिवस आड करून पाणीपुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात चार -चार दिवसांनी पाणीपुरवठा होतो.नागरिकांना कायम पाणी कधी येणार या मेसेजची वाट पाहावी लागते. यासाठी नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करा अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी लावून धरली. उद्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा करा, अशी मागणी विजय कदम, बाळा लळीत यांनी केली. घरपट्टी, पाणीपट्टी भरून घेता मग नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी न.पं.ची नाही का असा सवाल ग्रामस्थांनी केला. शैलेश कदम, विजय कदम, ज्ञानेश्वर खवळे, दयाळ गावकर, सौ. प्रियांका साळसकर, रवींद्र तारकर, शामसुंदर खेडेकर, आनंद रामाणे, आनंद कुळकर्णी, चारूदत्त सोमण, उल्हास मणचेकर, आप्पा अनभवणे,चंद्रहास मर्गज आदींनी प्रश्नांची सरबत्ती करून नगराध्यक्षा व मुख्याधिकार्यांना धारेवर धरले.
नगरसेवक बुवा तारी यांनी कोर्ले-सातंडी धरणावरून नवीन योजना प्रस्तावित केली असून त्याचा पाणी आरक्षणाचा दाखला मिळाला आहेर, अशी माहिती दिली. यावेळी नवीन योजना कार्यान्वित होण्यास बराच कालावधी जाईल. तोपर्यंत देवगड-जामसंडेवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, याची माहिती द्या, अशी मागणी केली. देवगडमधील कचर्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे याकडेही ग्रामस्थ, व्यापार्यांनी लक्ष वेधले. पाणी,कचरा, सांडपाणी हे प्रश्न गंभीर बसले आहेत. मात्र जनता गप्प आहे, असे यापुढे गृहित धरू नका, असे उपस्थित ग्रामस्थ व व्यापारी यांनी ठणकावून सांगितले.
शिरगाव-पाडाघर योजनेवर देवगड जामसंडेसह 11 गाव आहेत. उर्वरित 9 गावे पाणी बिल भरत नाहीत. फक्त देवगड - जामसंडे शहराची पाणीपट्टी पूर्णत: भरलेली आहे. मात्र तेथून पाणीपुरवठा देवगड-जामसंडेसाठी केल्यानंतर वॉल फिरवून पाणी चोरी केली जाते. यामुळे या योजनेवरून एक थेंब पाणी मिळत नाही हे सांगितले. यावर न. पं. प्रशासन म्हणून पाणी चोरी करणार्यांवर कोणती कारवाई केली, पोलिस तक्रार का केली नाही. पाणी बिल पूर्ण भरणार्यांना पाणी नाही व पाणी बिल थकीत ठेवणार्या गावांना पाणी मिळते हा कसला न्याय, असा संतप्त सवाल व्यापारी व ग्रामस्थांनी केला.