Sindhudurg News : जामसंडे येथे आंबा बागायतदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Sindhudurg News
जामसंडे येथे आंबा बागायतदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Published on
Updated on

देवगड : कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाकडून जाहीर करण्यात आलेली तुटपुंजी मदत तसेच मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अटकावाच्या निषेधार्थ देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी शनिवारी सायंकाळी जामसंडे एसटी स्टँडसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंबा बागायतदारांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत, ‘आंबा उत्पादकांची गळचेपी करणारे सरकार हद्दपार झाले पाहिजे’, अशा घोषणा दिल्या. यंदाच्या हंगामात देवगड हापूस आंब्याचे उत्पादन अवघे दहा टक्क्यांवर आले असून, बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. बागायतदारांनी सांगितले की, यावर्षी मोठ्या प्रमाणात आंबा कलमांना मोहर आला होता. मात्र हवामानातील बदल, वाढते तापमान व प्रतिकूल परिस्थितीमुळे फळधारणा झालीच नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांनी ओरोस येथे मोर्चा काढला होता. तसेच नांदगाव येथे महामार्ग रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील ‘वर्षा’ बंगला येथे मोर्चा नेण्यासाठी कोकणातील बागायतदार आझाद मैदानावर जमा झाले असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटकाव केल्याने मोर्चा होऊ शकला नाही. घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सायं. ६ वा. जामसंडे येथे आंबा बागायतदार एकत्र आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन केले. कोकणातील आंबा उत्पादकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. देवगड तालुका आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश वाळके, किरण टेंबुलकर, अजय तेली, राजू पाटील, विजय पाटील , जितेंद्र करंगुटकर आदींसह आंबा बागायतदार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news