Sindhudurg Crime : बँक खाते वापरायला दिलेल्या ११ जणांना अटक

जिल्ह्यात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल : पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
Sindhudurg Crime
डॉ. मोहन दहीकर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग
Published on: 
Updated on: 

ओरोस : घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष, खात्यात पैसे स्वीकारून दुसरीकडे पाठविण्याच्या बदल्यात मिळणारे कमिशन आणि नोकरीच्या आकर्षक ऑफर्स... या प्रलोभनांना बळी पडून स्वतःचे बँक खाते दुसऱ्याच्या हवाली करणे सर्वसामान्य नागरिकांना चांगलेच महागात पडू शकते! सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळते करण्यासाठी करत असून, अशा खातेदारांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा ‘म्यूल बँक अकाऊंट’ प्रकरणी पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ आरोपींचा समावेश आहे. नागरिकांनी पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते गुन्हेगारांच्या हातात देऊ नये, अन्यथा नकळत गंभीर सायबर गुन्ह्यांत अडकण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सायबर गुन्हेगार आता केवळ ऑनलाईन फसवणूक करून थांबत नाहीत, तर फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करत आहेत. कमिशनचे आमिष दाखवून, घरबसल्या काम देण्याचे सांगून, गेमिंग, शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी, फॉरेक्स ट्रेडिंगमधील व्यवहारांचे कारण पुढे करून किंवा व्यापारासाठी कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांकडून बँक खात्यांची माहिती मिळवली जाते. काही वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वास संपादन करूनही खाते, एटीएम कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची माहिती घेतली जाते. त्यानंतर या खात्यांचा वापर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी व ती वेगवेगळ्या खात्यांत हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.

अशा खात्यांना ‘म्यूल बँक अकाऊंट’ म्हटले जाते. आपल्या खात्यात आलेले पैसे दुसऱ्या खात्यात पाठवून दिल्याने केवळ कमिशन मिळते, एवढाच विचार करणाऱ्या खातेदारांना या व्यवहारांमागील गुन्हेगारीची कल्पनाही नसते. मात्र, त्या खात्यात सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा झाल्यास संबंधित खातेदारालाही पोलिसांच्या तपासाला सामोरे जावे लागू शकते. रक्कम कमी असो वा जास्त, बँक खाते कोणाच्या सांगण्यावरून वापरले गेले, व्यवहार कशासाठी झाले आणि त्यात खातेदाराची भूमिका काय होती, याची चौकशी होऊ शकते. त्यामुळे क्षणिक आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे बँक खाते दुसऱ्याला वापरू देणे धोकादायक ठरू शकते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, सिंधुदुर्गनगरी आणि देवगड या सहा पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथील मिळून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन संशयितांना गुन्ह्यातील सहभागाबाबत नोटीस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांची अनेक बँक खाती अशा गुन्ह्यांशी जोडली गेल्याचे समोर येत असल्याने अशा संशयास्पद खात्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

नागरिकांनी स्वतःचे बँक खाते मित्र, नातेवाईक किंवा अनोळखी व्यक्तीला पैसे जमा करण्यासाठी अथवा दुसऱ्या खात्यात पाठविण्यासाठी वापरू देऊ नये. एटीएम कार्ड, पिन क्रमांक, सीव्हीव्ही, ओटीपी, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड, यूपीआय पिन, चेकबुक किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. घरबसल्या सहज पैसे कमावण्याची संधी, मोठ्या कमिशनचे आश्वासन किंवा तातडीने कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास त्यामागील हेतू तपासणे आवश्यक आहे.

आपल्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून पैसे जमा झाल्यास ते स्वतःहून पुढे पाठवू नयेत किंवा खर्च करू नयेत. त्वरित बँकेला लेखी माहिती देऊन तक्रारीचा संदर्भ क्रमांक घ्यावा आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. खाते किंवा डिजिटल बँकिंगची माहिती आधीच दुसऱ्या व्यक्तीला दिली असल्यास बँकेला कळवून आवश्यक सुरक्षा उपाय करावेत. खात्यातील व्यवहारांचे संदेश आणि बँक स्टेटमेंट नियमित तपासणेही महत्त्वाचे आहे.

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात केवळ अनोळखी व्यक्तीच नव्हे, तर पैशांच्या आमिषाला बळी पडलेले आपले परिचित आणि कुटुंबीयही नकळत अडकू शकतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः सहज पैसे कमावण्याच्या ऑफर्स स्वीकारणाऱ्या तरुणांनी, सावध राहणे गरजेचे आहे.

आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे बँक खाते गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते आणि संपूर्ण कुटुंबाला आर्थिक व कायदेशीर संकटाचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची आर्थिक सुरक्षितता जपावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आणि सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news