

सावंतवाडी : मोठा गाजावाजा करून कोकण रेल्वे मार्गावर सुरू केलेल्या सीएसटी-सावंतवाडी एक्सप्रेसबाबत चाकरमान्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सुरुवातीलाच अस्वच्छ सीट्स आणि शौचालयांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यातच प्रशासनाकडून अचानक रेल्वेचे डबे बदलण्याचे प्रकार सुरू झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शनिवारी सीएसटीवरून सुटलेल्या आणि परतीच्या प्रवासात असलेल्या रेल्वे क्रमांक १२५३४-१२५३३ सावंतवाडी एक्सप्रेसमधील 'A2', 'HA1' आणि '3AC इकॉनॉमी'चे तीन असे मिळून एकूण पाच महत्त्वाचे एसी डबे अचानक काढण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन बुकिंगद्वारे एसी सीट्सचे पूर्ण भाडे भरलेल्या प्रवाशांना थेट स्लीपर कोचमध्ये बसवून प्रवास करावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून एसीचे पूर्ण भाडे वसूल करूनही स्लीपर कोचची सोय केल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
विशेष म्हणजे, ही एक्सप्रेस रेल्वे सावंतवाडीहून सीएसटीकडे गेल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता 'नबाबांचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊ शहराकडे 'पुष्पक एक्सप्रेस' म्हणून रवाना होते. असे असतानाही, हीच अस्वच्छ आणि एसी डबे काढलेली रेल्वे गाडी सीएसटी स्टेशनवरून लखनऊकडे पाठवली जात असल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
गणेश चतुर्थी सणाच्या पूर्वसंध्येला या नियमित मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेसचा शुभारंभ रात्री ११:४५ वा. सीएसटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता. सुरुवातीला फुलांनी सजवून ही गाडी मार्गावर धावती करण्यात आली खरी, मात्र अवघ्या काही दिवसांतच या गाडीची दुरवस्था झाली असून प्रत्यक्षात या गाडीचा मनस्ताप कोकणवासीयांना सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाकडून सीएसटी-सावंतवाडी एक्सप्रेसला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत, अवघ्या काही दिवसांतच समोर आलेल्या या ढिसाळ कारभारामुळे कोकण रेल्वे प्रशासन आणि राजकीय मंडळींबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व नाराजी व्यक्त केली आहे.