Sindhudurg crime | नारळ चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयिताचा बागमालकावर हल्ला; गुन्हा दाखल

Sindhudurg crime | नारळ चोरीच्या उद्देशाने आलेल्या संशयिताचा बागमालकावर हल्ला; गुन्हा दाखल
Published on
Updated on

देवगड : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने नारळ जमा करताना अटकाव करणाऱ्या बागमालकास मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रवींद्र महादेव खाजणवाडकर (वय ६०, रा. कोटकामते-लिंगडाळवाडी) या संशयितविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश पुंडलिक खाजनवाडकर (वय ४९, रा. कोटकामते-लिंगडाळवाडी) हे 6 जून रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या घराचे दरवाजे व खिडक्या बंद करत असताना घराच्या मागील बाजूस असलेल्या माडबागेत लाईटचा प्रकाश दिसला. या प्रकाराचा त्यांना संशय आल्याने ते तेथे पाहणी करण्यासाठी गेले असता संशयित रवींद्र खाजणवाडकर हा तेथे नारळ जमा करताना दिसला.

फिर्यादी राकेश खाजणवाडकर हे घटनास्थळी येत असल्याचे पाहून संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेश खाजनवाडकर यांनी त्याचा पाठलाग केला असता संशयिताने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच जवळ पडलेल्या दांड्याने त्यांच्या पाठीवर वार करून मारहाण केली. या मारहाणीत बचाव करताना राकेश खाजनवाडकर यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

तसेच संशयिताने दगड अंगावर फेकून मारल्याचे तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचे राकेश खाजणवाडकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार संशयित रवींद्र महादेव खाजणवाडकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १२५(अ), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news