Sindhudurg News : धाकोरेत २५ किलो गोमांस टाकून फरार झालेल्या संशयिताला अखेर अटक!

सावंतवाडी-वेंगुर्ला पोलिसांची संयुक्त कारवाई; सराईत गोमांस तस्कर जाळ्यात
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

सावंतवाडी : धाकोरे येथे २५ किलो गोमांस टाकून फरार झालेल्या संशयित आरोपीला सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून अटक केली आहे. सरफराज बाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) असे या सराईत आरोपीचे नाव असून, त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

दि. १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयित सरफराज दुचाकीवरून २५ किलो गोमांस विक्रीच्या उद्देशाने घेऊन आजगावच्या दिशेने जात होता. धाकोरे रस्त्यावर जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला. ग्रामस्थ मागे लागल्याचे पाहून आरोपीने गोमांस उदय मुळीक यांच्या काजूच्या बागेत फेकून दिले आणि दुचाकीसह पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वेंगुर्ला पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी सावंतवाडीतील बाहेरचा वाडा येथील घराजवळ आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक माधुरी मुळीक, प्रमोद पाटील यांच्या पथकाने आरोपीच्या हालचालींवर निगराणी ठेवली. दरम्यान, वेंगुर्ला पोलिस उपनिरीक्षक राठोड यांचे पथकही तेथे दाखल झाले. दोन्ही पथकांनी अत्यंत गुप्त पद्धतीने मोहीम राबवून संशयिताला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील अधिक तपास वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा बीटचे ठाणे अंमलदार प्रसाद कदम करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये गोवंश कत्तलीस बंदी असताना बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या या आरोपीच्या अटकेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news