Sindhudurg News : दारू तस्कर, गुन्हेगारी क्षेत्रातील तिघे ‘तडीपार’

कुडाळ पोलिसांची कारवाई : ​सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून १ वर्षासाठी हद्दपार
तडीपार
तडीपार
Published on
Updated on

​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहून जनतेला भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी कुडाळ पोलिसांनी गुन्हेगारी जगताला मोठा दणका दिला आहे. कुडाळ पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील गोवा दारूची अवैध तस्करी व विक्री करणारे दोन आणि शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारा एक, अशा एकूण तीन सराईत गुन्हेगारांना एका वर्षाकरिता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.

​'हे' आहेत तडीपार झालेले सराईत गुन्हेगार

यामध्ये आत्माराम ऊर्फ मनोज मनोहर नार्वेकर (४३, रा. माणगाव, बाजारपेठ, ता. कुडाळ) व संदीप परशुराम पावसकर (३८, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) दोघेही गोवा दारू तस्करी व सुजल सचिन पवार (२१, रा. तेसेंबांबर्डे, ता. कुडाळ) शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम व सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी घन:शाम आढाव यांनी कुडाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सतत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.​त्यानुसार कुडाळचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गेल्या काही वर्षांत आणि सद्यस्थितीत सातत्याने गुन्हे करणाऱ्या या तिघांची कुंडली (माहिती) संकलित केली. उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयासमोर या प्रस्तावाची रितसर सुनावणी झाली. कुडाळ उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या तिन्ही अट्टल गुन्हेगारांना सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतून १ वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news