

कणकवली : अलीकडच्या महिन्याभरात घरफोड्यांचे सत्र थांबले असे वाटत असताना खारेपाटणनजीक नडगिवे-धुरीभाटले या एकाच वाडीतील सहा बंद बंगले चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. हे बंगले बंद असल्याने त्यातून काही मुद्देमाल चोरीस गेला की नाही, हे समजू शकलेले नाही. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा चोरटे कैद झाले असून त्या चोरट्यांच्या मागावर पोलिस आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणपासून नजीक असलेल्या नडगिवे या गावात शेर्पे-नडगिवे रोडवर धुरीभाटले ही वाडी आहे; मात्र अनेक ग्रामस्थ नोकरी - धंद्यानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्यांची घरे बंद आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यानी सहा बंद बंगले फोडून चोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी मोहन सखाराम मण्यार, संदीप पांडुरंग मांजरेकर, भास्कर शंकर राणे, रवींद्र वासुदेव मांजरेकर, शंकर सीताराम आंबेरकर, अमोल सदाशिव मयेकर यांचे बंद बंगले दरवाजांचे कडी-कोयंडे तोडून फोडले. पोलिसपाटील जितेंद्र मण्यार यांनी चोरीची घटना पोलिसांना कळविल्यानंतर खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार मिलिंद देसाई, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.