Sindhudurg Crime : घाटांमधील 'ते' दोन अपघात नसून थरारक खूनच

मुंबई आणि चंदगड पोलिसांचा यशस्वी तपास; ७ जण जेरबंद
Sindhudurg Crime News
कणकवली/दोडामार्ग : फोंडा घाटच्या खोल दरीत त्यावेळी सापडलेला मृतदेह.
Published on
Updated on

कणकवली/दोडामार्ग : फोंडा घाटामध्ये चार वर्षांपूर्वी घडलेला अपघात हा अपघात नसून तो खून होता, हे शोधून काढण्यास मुंबई गुन्‍हे अन्वेषण शाखेने यश मिळविले असून याप्रकरणी चार संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच तिलारी घाटामध्ये आठ दिवसांपूर्वी झालेला तो अपघात, अपघात नसून त्या महिलेचा खून असल्याचे चंदगड पोलिसांनी शोधून काढले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तिघाजणांना जेरबंद केले आहे. योगायोगाने या दोन्ही घाटांतील अपघात प्रकरणातील मृतांचा गुन्हा एकाचवेळी उघडकीस आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

२८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडा घाटात मुलानी नामक इसमाचा मृतदेह सापडला होता. फोंडा घाट बाजारपेठेपासून १० कि.मी. अंतरावर १५ ते २० फूट खोल दरीत हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्याच्या बाजूलाच एक मोटारसायकलदेखील सापडली होती. सिंधुदुर्ग पोलिसांनी याकडे प्रथमदर्शनी अपघात म्हणून पाहिले. परंतु, मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा कक्ष ७ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आत्माजी सावंत यांना गुप्तपणे याबाबत खबर मिळाली.

तो अपघात नसून खून असल्याचे सांगण्यात आले. सावंत यांनी तपास गतिमान केल्यानंतर मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, आतिष मोरे, अमित राऊत, अनिल भंडारी आणि ऋतुराज शेट्टी यांचा असफाक मुलानी यांच्यासोबत पैशावरून वाद झाला होता, हे उघडकीस आले. या वादातून मुलानी यांचा एका हॉटेलमध्ये खून झाला आणि मुलानी यांचा मृतदेह फोंडा घाटात खोल दरीत टाकण्यात आला. यापैकी मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, आतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांना अटक केली आहे.

प्रेम प्रकरणातून खून

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी दोडामार्गजवळील तिलारी घाटात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या घाटात एक दुचाकी सापडली होती. तिलारी घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकाचा समावेश असून यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (वय ५७), बसवराज यल्लाप्पा करणावर (३३, दोघेही रा. राजकोटे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि लगमाप्पा अंकलगी (३७, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून बेळगाव जिल्ह्यातील गंगव्वा सत्त्याप्पा हंचीमणी (२५, रा. वंटमोरी, ता. जि. बेळगाव) हिचा तिलारी घाटात खून केल्याची कबुली दिली आहे.

पैशाचा वाद आणि प्रेमप्रकरण

फोंडा घाटात टाकलेला मृतदेह आणि झालेला खून हा पैशाच्या वादातून घडलेला गुन्हा असून ज्या हॉटेलमध्ये मारहाण झाली ते हॉटेल कुडाळ भागातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सिंधुदुर्ग पोलिस संशयिताला ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे गेले आहेत. तिलारी घाटात युवतीचा खून झाला होता. ही युवती हुबळीची होती आणि हा गुन्हा प्रेमप्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news