

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे महाराष्ट्रात केली जाणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्यात बांदा पोलिसांना मोठे यश आले आहे. बांदा चेकनाक्यावर केलेल्या कारवाईत गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा १४ चाकी ट्रक पकडून तब्बल १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुणे येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांना गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे मोठ्या प्रमाणात मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा चेकनाक्यावर तपासणी अधिक कडक करण्यात आली होती. शनिवारी पहाटे पोलीस कर्मचारी सुशांत हिर्लेकर, विलास भोगले आणि राजेंद्र बर्गे हे तपासणी नाक्यावर होते. त्यावेळी संशयित क्रमांकाचा ट्रक तपासणीसाठी थांबविण्यात आला.
ट्रकची सखोल तपासणी केली असता त्याच्या मागील हौदयात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा आढळून आला. यामध्ये १८० मिली क्षमतेच्या ६३,०७२ बाटल्या आणि ७५० मिली क्षमतेच्या ७,५०० बाटल्या असा एकूण ७० हजारांहून अधिक बाटल्यांचा साठा होता. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत १ कोटी २१ लाख ६० हजार ७१६ रुपये असून ट्रकची किंमत १५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपये इतकी आहे. या प्रकरणी भारत संदिपान जाधव (वय ३१, रा. वाघोली, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीविरोधात बांदा पोलीसांनी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. या कारवाईमुळे मद्यतस्करांच्या साखळीचा आणखी उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नियोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार विलास भोगले, रामचंद्र तेली, पोलीस कर्मचारी सुशांत हिर्लेकर, राजेंद्र बर्गे तसेच हवालदार सिद्धार्थ माळकर, राजेश गावस, दादा परब, राजाराम कापसे, प्रसाद पाटील आणि रोहित कांबळे यांनी केली.
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेळोवेळी मोठ्या प्रमाणात दारूसाठे जप्त होत असतानाच काही प्रकरणांत दारूमाफिया आणि संबंधित यंत्रणांमधील काही ठराविक कर्मचारी यांचे साटेलोटे असल्याचे आरोप झाले आहेत.