

देवगड : वाडा येथे अवैध खतसाठ्यावर देवगड तालुका कृषी विभागाने धाड टाकली आहे. या कारवाईत खत वाहतुकीसाठी वापरलेल्या ट्रकसह सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा सेंद्रिय खताचा साठा जप्त करण्यात आला असून, खताचा साठा करण्यासाठी वापरले जाणारे गोडाऊनही सील करण्यात आले आहे. कृषी विभागाने ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास केली असून, या धडक कारवाईने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुका कृषी विभागाला वाडा येथील अवैध खतसाठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाडा येथील आंबेडकर चौकात छापा टाकला.
आंबेडकर चौकातील एका गोडाऊनसमोर ट्रक उभा करून, त्यातील अवैध खतसाठा गोडाऊनमध्ये उतरवण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून विनापरवाना वाहतूक आणि साठा करण्यात येत असलेला सेंद्रिय खताचा साठा जप्त केला. यामध्ये सुमारे ५७ हजार रुपये किमतीच्या १०० पोत्यांचा समावेश आहे.
विनापरवाना खत वाहतुकीसाठी वापरलेला ट्रकही तालुका कृषी विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी अवैध खताचा साठा केल्याबद्दल वाडा येथील संशयित सत्यवान परशुराम परब याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.