Sindhudurg Collector Trupti Dhodmise | जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कचरा उचलला ; बाकी आंबोली म्हणजे गर्दीचाच धबधबा

Sindhudurg Collector Trupti Dhodmise | सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रविवारी आंबोलीत स्वच्छता मोहिमेत स्वतः कचरा उचलला आणि जिल्ह्यातील प्लॅस्टिक कचऱ्याविरोधात युद्ध पुकारले.
Sindhudurg Collector Trupti Dhodmise
Sindhudurg Collector Trupti Dhodmise
Published on
Updated on

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी रविवारी आंबोलीत स्वच्छता मोहिमेत स्वतः कचरा उचलला आणि जिल्ह्यातील प्लॅस्टिक कचऱ्याविरोधात युद्ध पुकारले. भर पावसात निघालेल्या स्वच्छता वारीत स्वच्छता संदेश देताना पर्यटक मुलींना त्यांनी विचारले 'आपण कुठून आलात?' त्या मुलींनी फक्त 'वेतौरे' इतकच उत्तर दिलं. 'अरे, हे आपल्याच जिल्ह्यातील पर्यटक आहेत', असे उद्गार जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडून निघताच उपस्थितांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला.

Sindhudurg Collector Trupti Dhodmise
Goa Panchayat Politics | "तोरसे पंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव"

जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केवळ ११ महिने झाले असताना 'वेतौरे' हे गाव आपल्या जिल्ह्यातील आहे, हे त्यांच्या सहज आणि चटकन लक्षात आले. समर्पित भावनेने काम केले तरच असे शक्य होते, असे उद्गारही उपस्थितांच्या तोंडून निघाले.

बजारपेठा, घाट रस्ते, पर्यटन स्थळे या ठिकाणी जायचे आणि स्थानिक ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, संस्थांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबवायची. स्वच्छतेविषयी जनजागृती करायची हे या मिशनचे स्वरूप. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ करणे हे या मिशनचे उद्दिष्ट. आंबोलीत स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची हाक जेव्हा मिशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिली तेव्हा त्यांनी त्या हाकेला लगेच 'ओ' दिली. घाटातील रविवारच्या गर्दीतून मार्ग काढत त्यांनी आंबोली गाठली. हँडग्लोव्हज घालून स्वतः कचरा उचलला. उघड्या सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कर्नाटक, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या हजारो पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश दिला. पर्यटकांना त्यांची जबाबदारी सांगितली.

सर्वानीच कचऱ्याला हात घातला

आंबोलीच्या माजी सरपंच प्रशासक सावित्री पालेकर आणि पर्यटन व्यावसायिक निर्णय राऊत यांनी स्वच्छता मिशनला सर्वतोपरी मदत केली. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी आल्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी, गटविकास अधिकारी, वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ सर्वांनीच कचऱ्याला हात घातला. प्लॅस्टिक कचऱ्याविरोधात आंबोली हिलस्टेशनवरून जणू रणशिंग फुंकले गेले. प्रशासक सावित्री पालेकर यांनी तर स्वच्छता मिशनच्या स्वच्छता प्रेमींसोबत मोहीम पूर्णत्वास जाईपर्यंत कचरा उचलला.

हजारो पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश

स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग हा एक जिल्ह्यातील स्वच्छता प्रेमींचा ग्रुप आहे. जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, बाजारपेठा, घाट रस्ते, पर्यटन स्थळे या ठिकाणी जायचे आणि स्थानिक ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला, संस्थांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबवायची. स्वच्छतेविषयी जनजागृती करायची हे या मिशनचे स्वरूप. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ करणे हे या मिशनचे उद्दिष्ट.

काय धुके... काय निसर्ग... काय गर्दी

आंबोलीची सर तशी कोणाला येणार? काय तो निसर्ग... काय ते धुके... काय तो पाऊस... असंच म्हणावं लागेल, असं सध्याचं तिथलं वातावरण. याच आंबोलीच्या आकर्षणापोटी हजारो पर्यटक शनिवार, रविवार प्रचंड गर्दी करतात. चार-चार कि.मी.च्या गाड्यांच्या रांगा अंगावर शहारे आणतात. ज्या धबधब्यावर पर्यटक जातात तो धबधबा पाण्याचा आहे की पर्यटकांच्या गर्दीचा असा प्रश्न तिथे गेल्यावर पडतो. पूर्ण धबधब्यावर पाणी दिसलंच नाही, पर्यटकच एकमेकांना खेटून धबधब्याचा आनंद रविवारी लुटताना दिसत होते. काय त्या गाड्या... काय ती गर्दी आणि काय तो जल्लोष... असेच उद्गार तिथे गेल्यावर बाहेर पडतात.

वाढत्या पर्यटकांची संख्या 'कॅश' कशी करणार?

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आंबोलीत रविवार असला तरी मुख्य धबधब्याजवळ सहजरित्या गाडी पार्क करता येत होती इतकी जागा होती. आता तिथे जाण्याचे धाडस होत नाही, इतक्या गाड्यांच्या रांगा असतात. जिथे जागा मिळेल तिथे पार्किंग होते. हजारोच्या संख्येने पर्यटकांच्या गाड्या विकेंडला येतात. गोवा, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र मधीलच जास्तीत जास्त गाड्या. जिल्ह्यातील गाड्या तुलनेने कमीच दिसतात. इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना कर रूपाने अपेक्षित आर्थिक उत्पन्न जमा होत नाही, असे चित्र दिसते आहे. आता शासनानेच तिथे अधिक प्रभावी यंत्रणा राबवून सिस्टीम बसवण्याची गरज आहे. पर्यटकांकडून योग्य प्रमाणात कर गोळा करून तिथे पार्किंग झोन, सुरक्षा, सुविधा आणखी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे. योग्य दिशेने शासनाने जर आंबोली पर्यटन विकास केला तर जिल्ह्यातील हे पर्यटनस्थळ जिल्ह्याच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ करणारे आणि रोजगार निर्मिती करणारे ठरेल.

Sindhudurg Collector Trupti Dhodmise
Sindhudurg Sports News | ‘सिंधु जलकन्या’ पूर्वा गावडेची जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

ग्रामपंचायतींना मदतीचा हात हवा

आंबोली असो की गेळे, चौकुळ असो, ग्रामपंचायतींना शासनाचा मदतीचा हात हवा आहे. आंबोली प्रशासक सावित्री पालेकर यांचे म्हणणे आहे की, आंबोलीतील पर्यटकांची संख्या हाताबाहेर जात आहे. प्रचंड कचरा होतो, त्यासाठी कचरा डेपो शासनाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सावित्री पालेकर यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. हजारो गाड्या जेव्हा घाटातील निमुळत्या रस्त्यावर उभ्या असतात, चालत असतात तेव्हा या प्रचंड संख्येने चालणाऱ्या गाड्यांचा भार हा घाट किती दिवस पेलेल अशी भीती देखील वाटते.

उभं आयुष्य जिल्ह्यात राहून जगल्यानंतरही सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेकांना सर्व गावांची माहिती नाही. एवढेच कशाला सरकारी सेवेत दहा-पंधरा वर्षे घालविलेल्या अनेकांना एखाद गाव कोणत्या तालुक्यात आहे, हे देखील आठवत नाही. एखाद्या नावाचे गाव आपल्या जिल्ह्यात आहे की नाही, याचीही माहिती नसणारे अनेकजण भेटतील. वेतौरे गाव तसे कुडाळ वरून वेंगुर्लेकडे जाताना रस्त्यात लागणारे इतर गावांसारखे एक गाव. ११ महिन्यांच्या कालावधीत हे गाव सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना माहित असणे हे जीव ओतून काम केल्यामुळेच शक्य आहे, अशा भावना तिथे जमलेल्यांकडून व्यक्त झाल्या.

सांगलीत शुक्रवार होता स्वच्छतेचा

गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची सिंधुदुर्गातील पहिलीच प्रशासकीय सेवा. तत्पूर्वी त्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक होत्या. तिथे त्यांनी प्रभावी सेवा बजावली. असच्छता आणि प्लास्टिक कचऱ्याविरोधात तिथे तर त्यांनी युद्धच पुकारले होते. दर पंधरा दिवसांनी जिल्ह्यातील एखाद्या गावात त्या जाच्या आणि स्थानिकांना घेऊन स्वच्छता मोहिमेवर काम करायच्या. त्यासाठी त्यांनी शुक्रवारचा दिवस निश्चित केला होता. ग्रामविकासाच्या मार्गावर चालण्याची धडपड करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील लोकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपल्या कामाप्रती त्यांचे समर्पण दिसते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news