

भारत-पाकिस्तान दरम्यान युद्ध परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची किनारपट्टी अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. किनारपट्टी तसेच प्रत्यक्ष सागरीक्षेत्रात गस्त वाढवण्यात आली असून समुद्रकिनारी असलेल्या महत्त्वाच्या भागांमध्ये व बंदर जेटीवर सिंधुदुर्ग पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या सर्व बोटींची कसून तपासणी करण्यात येत असून वाहनांची, अनोळखी व्यक्तींची, हॉटेल, लॉजिंगची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी अचानक नाकाबंदीही करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रेडी, निवती, विजयदुर्ग, मालवण, देवगड, आचरा, वेंगुर्ले, तारकर्ली अशा 8 बंदर जेटी आहेत. या सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागर सुरक्षा सदस्यांना सतर्क करण्यात आले आहे. समुद्रात एखादी संशयित बोटी किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास त्यांची तत्काळ माहिती पोलिसांना देण्याचेे आव्हान केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीच्या विजयदुर्ग ते रेडी या टप्प्यात पोलिसांनी 92 लँडिंग पॉईंट निश्चित केले असून या सर्व ठिकाणी फिरत्या ड्रोन कॅमेर्यांसह पोलिसांचीही 24 तास करडी नजर व गस्त असणार आहे.
मालवण, विजयदुर्ग, देवगड, वेंगुर्ले व रेडी या जेटी पॉईंटवर बोटींची व खलाशांची तपासणी सुरू असून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शहरी भागात गाड्यांची तपासणी सुरू आहे. सिंधुदुर्ग पोलिस दलाने सागरी सुरक्षा दलात वाढ केली असून अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत.
आपल्याला अनोळखी इसम किंवा संशयित वस्तू आढळल्यास ‘डायल 112’ किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून करण्यात येत आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नौदलामार्फत देण्यात आलेल्या सूचनेनुसार मुंबई, पालघर या परिसरतील 8 ठिकाणी नो फिशिंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी या ठिकाणी मच्छीमारांनी फिशिंगला जाऊ नये, तसेच संशयित नौका आढळल्यास मत्स्य विभागाला किंवा तटरक्षक दलाला कळविण्यात यावे, समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी जाणार्या नौकांची व येणार्या नौकांची तपासणी नियमितपणे करत आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे व मत्स्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी केले आहे.