

कुडाळ : ऑनलाईन औषधविक्रीसह बनावट औषधांविरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात कुडाळ तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तालुक्यातील सुमारे १३० हून अधिक मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील औषध विक्री व्यवस्था ठप्प झाली.
विविध मागण्यांबाबत पुकारलेल्या या देशव्यापी आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेतला. जिल्हाभरातील किरकोळ व घाऊक अशा सर्वच मेडिकल व्यावसायिकांनी आपले मेडिकल स्टोअर्स बंद ठेवत शासनाचे लक्ष वेधले. कुडाळ शहर व तालुक्यातील जवळपास १३० हून अधिक मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद ठेवत व्यावसायिकांनी या देशव्यापी आंदोलनात सहभाग दर्शवला. तालुक्यात या आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील जवळपास १३० हून अधिक सर्वच मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आले होते. मात्र आंदोलनामुळे गंभीर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन व रूग्णालयातील इमर्जन्सी औषध सेवा सुरू होती, अशी माहिती तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून देण्यात आली.