Sindhudurg News| सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार हक्काची गोवा बाजारपेठ

​सिंधुदुर्ग बँकेच्या शिष्टमंडळाचा गोवा अभ्यास दौरा; येत्या हंगामात ५ हजार मेट्रिक टन काजू खरेदीचे उद्दिष्ट
Sindhudurg News
सिंधुदुर्गच्या काजू, सुपारीला मिळणार हक्काची गोवा बाजारपेठ
Published on: 
Updated on: 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाला आदी शेतीमालाला योग्य व स्थिर दर मिळावा, तसेच सहकाराच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फोंडा (गोवा) येथील ‘गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्यादित’ला भेट देऊन संस्थेच्या कार्यपद्धतीची पाहणी केली.

या दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, काजू प्रक्रिया उद्योजक, काजू तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून संस्थेची खरेदी-विक्री, प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन व्यवस्था समजून घेतली. तसेच संस्थेच्या ॲग्रो प्रोसेसिंग युनिटला प्रत्यक्ष भेट देऊन कामाची माहिती घेतली.

जिल्ह्यात तालुकास्तरावर खरेदी केंद्रे उभारणार

गोवा बागायतदार संस्थेने स्वतःची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करून ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या उत्पादित मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि बाजार समित्यांना एकत्र आणून तालुकास्तरावर खरेदी केंद्रे आणि जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​नफ्यातील लाभांश थेट शेतकऱ्यांना मिळणार

सहकारी संस्थांच्या माध्यमातून काजू व सुपारीची प्रतवारी करून दर्जानुसार दर निश्चित केले जाणार आहेत. येत्या हंगामापासून जिल्ह्यात किमान ५,००० मेट्रिक टन काजू बी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सुपारीसाठीही स्वतंत्र धोरण आखले जाणार आहे. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग व ब्रँडिंगला चालना देऊन विक्रीतून मिळणारा नफा व लाभांश थेट शेतकऱ्यांना दिला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​मान्यवरांची उपस्थिती

या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, गणपत देसाई, विद्याधर परब, तुळशीदास रावराणे, अशोक सारंग, सुनील उकिडवे, दीपक ठाकूर, अमित आवटी, नीलेश पवार, विलास ठाकूर, योगेश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, डॉ. प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.