

ओरोस : राज्यभरात खून, दरोडे, बलात्कार, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे 47 गुन्हे दाखल असलेल्या 27 वर्षीय अहिल्यानगर जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला सिंधुदुर्ग पोलिसांनी अहिल्यानगर कर्जत भागात अटक केली आहे. मोका लागलेला हा गुन्हेगार राज्यातील पोलीस दलाच्या रडारवर होता.
कणकवली येथे 19 डिसेंबर 2024 रोजी तीन लाख 26 हजार दागिन्यांच्या चोरी प्रकरणात त्याचे सीसीटीव्ही फुटेज व जंगल भागात सोडलेली मोटरसायकल एवढ्याच पुराव्यावर या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांनी शोधून अटक केली आहे. या गुन्ह्यात अन्य दोन नातेवाईक साथीदारांचा समावेश असून त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या गुन्हेगाराने राज्यात अन्य ठिकाणी गंभीर गुन्हे केले असून राज्यातील सर्व पोलीसदल त्याच्या मागावर होते. कणकवली येथे हे चोरी प्रकरण घडताच १९ डिसेंबर रोजी कणकवली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग या पोलीस यंत्रणेने या गुन्ह्याचा तात्काळ पाठवा सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंट या आधारे सिंधुदुर्ग पोलिसांनी अहिल्यानगर कर्जत भागात त्याला ताब्यात घेतले.
न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. जिल्ह्यातील कुडाळ येथे घडलेला एक गुन्हा यात त्याचा सहभाग आहे का याची पडताळणी पोलीस करत आहेत. तर फोंडा घाट येथील मोटरसायकल प्रकरणात त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. कणकवली दागिने चोरी प्रकरणातीलही त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणून त्याला राज्यातील अन्य पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जाणार आहे असेही जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल म्हणाले.
कणकवली व फोंडा येथील गुन्ह्यात असलेले फिंगरप्रिंट आरोपीच्या फिंगरप्रिंटशी मिळते जुळते असून सीसीटीव्ही फुटेजवर त्याची ओळख पटविण्यात आली आहे. हे गुन्हे आपण केल्याची कबुली त्याने दिली आहे. राज्यात अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असून तब्बल ४७ गुन्हे त्याच्यावर आहे. अनेक जिल्ह्यातील खून, सरकारी कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला, बलात्कार दरोडा जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर आहेत. या गुन्हेगाराविषयी व त्याच्या साथीदारांविषयी पोलीस तपास सुरू आहे. त्याचे अनेक भाऊ असून प्रत्येक गुन्ह्यात त्याने दोन-चार साथीदारांचा सहभाग घेतला आहे. सिंधुदुर्गातील गुन्ह्यामध्ये दोन साथीदारांचा त्याने सहभाग घेतला आहे. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले
राज्यभर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असे गुन्हेगार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे धाडस करू नये म्हणून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा गुन्हेगारांची माहिती शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवावे. व अशा गुन्हेगारांनी सिंधुर्गात येऊन गुन्हा करू नये याचे दक्षता घ्यावी असेही आदेश दिल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या गुन्हाच्या तपास कामांमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक हाडळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, जयेश सरमळकर, व अमित तेली यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सौरभ कुमार अग्रवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले.