Sindhudurg Exam Scam : तब्बल सात पेपरांच्या पुरवण्या दुसऱ्याच्या हस्ताक्षरात!

दहावीच्या भुईबावडा परीक्षा केंद्रातील गैरप्रकाराने खळबळ
Board Exam Scam
दहावी परीक्षा Pudhari File photo
Published on
Updated on

वैभववाडी : भुईबावडा येथील दहावी परीक्षा केंद्रावर झालेल्या धक्कादायक गैरप्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याच्या नऊ पेपरांपैकी तब्बल सात पेपरांच्या पुरवण्या अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकारात संबंधित विद्यार्थ्याच्या शिक्षक असलेल्या वडिलांचा सहभाग असल्याची चर्चा रंगली असून शिक्षण क्षेत्रालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचे उघड झाले. परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकांकडे गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात स्पष्ट फरक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत कोकण विभागीय बोर्डाकडे तक्रार दाखल केली.

बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विद्यार्थ्याचे सर्व नऊ पेपर मागवून तपासणी केली. तपासणीत सात पेपरांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांमधील हस्ताक्षर पूर्णतः वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भुईबावडा केंद्र संचालक तसेच परीक्षा केंद्रावर सुपरवायझर म्हणून काम करणारे शिक्षक व इतर जबाबदारी असलेले शिक्षक यांना कोकण विभागीय बोर्डाच्या रत्नागिरी कार्यालयात  बोलावून सखोल चौकशी व जबाब नोंदविण्यात आले आहेत. तब्बल तास, दीड तास प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चौकशी करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती असून त्याच्यावर ‘रस्टिकेट’ची कारवाई होण्याची शक्यता आहे. चौकशीत संबंधित विद्यार्थी हा भुईबावडा केंद्रातील एका माध्यमिक विद्यालयाचा असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील स्वतः एका दुसऱ्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असून मुलाला सेमी इंग्रजी शिक्षणासाठी भुईबावडा येथील विद्यालयात प्रवेश दिला होता.

कोकण विभागीय बोर्डाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात असताना, सीसीटीव्ही देखरेखीखाली सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान उत्तरपत्रिका वर्गाबाहेर कशा गेल्या आणि पुन्हा मुख्य उत्तरपत्रिकेला कशा जोडल्या गेल्या, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रकार एका विषयापुरता मर्यादित नसून सात पेपरांमध्ये झाल्याने या गैरप्रकारात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात कॉपी पुरवणारे रॅकेट कार्यरत असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून कोकण विभागीय बोर्डात सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल राहिला आहे. त्यात वैभववाडी तालुका गुणवत्तापूर्ण निकालासाठी विशेष ओळखला जातो. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्राच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news