Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी!

पर्यटन हंगाम सांगतेच्या मार्गावर; साहसी खेळ, मालवणी मेजवानीसाठी कोकणात हाऊसफुल्ल
Sindhudurg Tourism
Sindhudurg Tourism
Published on
Updated on

काशिराम गायकवाड

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने आणि पावसाळा जवळ आल्याने राज्यासह देशभरातील पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. पर्यटन हंगाम संपण्यापूर्वी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्याच्या सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

सध्या वेंगुर्ले, मालवण आणि देवगड तालुक्यातील किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. सागरेश्वर, मोचेमाड, शिरोडा-वेळागर, खवणे, भोगवे, तारकर्ली, देवबाग आणि आचरा यांसारख्या स्वच्छ आणि निळाशार किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य वातावरणासोबतच पर्यटक कायाकिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस्‌ आणि समुद्र सफरीसारख्या साहसी खेळांचा मनमुराद आनंद घेत आहेत. याशिवाय, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला, रॉक गार्डन आणि वेंगुर्लेतील झुलता पूल यांसारख्या पर्यटनस्थळांनाही पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेटी देत आहेत.

मालवणी खाद्यसंस्कृती पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. सी-फूड, मालवणी थाळी, कोंबडी-वडे आणि सोलकढीचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल्स आणि खानावळींमध्ये मोठी गर्दी असून, काही ठिकाणी प्रतीक्षा करावी लागत आहे. या वाढत्या पर्यटनामुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, होम-स्टे, बोट मालक, वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळाला असून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे.

२६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यटन बंद

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाने दिलेल्या आदेशानुसार, मालवण सागरी बंदर परिसरातील जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच पर्यटकांनी सिंधुदुर्गात मोठी गर्दी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news