

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या छोट्याशा शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने आज मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाची आवड, अथक परिश्रम, जिद्द आणि स्वप्नांच्या दिशेने सातत्याने केलेली वाटचाल यांच्या जोरावर वैष्णवी कल्याणकर हिने छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यापर्यंत यशस्वी मजल मारली आहे. १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या ‘घबाडकुंड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
वैष्णवीने लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासली. पुढे मुंबईत उच्च शिक्षण घेत असताना अभिनय क्षेत्रातील संधी शोधण्यास सुरुवात केली. जाहिराती, म्युझिक व्हिडिओ, वेब सिरीज आणि विविध कलात्मक उपक्रमांतून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. मराठी दूरचित्रवाणी विश्वात तिच्या कारकिर्दीला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील गाजलेल्या ‘देवमाणूस- २’ या मालिकेमुळे. या मालिकेतील ‘सोनू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यानंतर ‘तू चाल पुढं’ या मालिकेतील ‘मयुरी वाघमारे’च्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. मालिकेतील तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांशी तिचे एक वेगळे नाते निर्माण झाले.
याचबरोबर ‘टिकली’ मालिकेतील भूमिकेदेखील प्रेक्षकांनी उचलून धरली. प्रत्येक भूमिकेतून स्वतःची वेगळी छाप उमटवणाऱ्या वैष्णवीने अल्पावधीतच मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले.छोट्या पडद्यावरील यशानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीकडे वाटचाल केली. ‘बॅम्बू’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकत तिने आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. आता ‘घबाडकुंड’ या रहस्य, थरार आणि साहसाने भरलेल्या चित्रपटातून ती पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमघर यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे वैष्णवीच्या अभिनय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. वैष्णवीने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे आव्हान पेलत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. तिचे यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण बांदा शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान आहे.